CM Devendra Fadnavis : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. यातच काही दिवसांपूर्वी कुणबी नोंद असलेल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी अध्यादेश काढला. या अध्यादेशामुळे ओबीसी आक्रमक झाले. सरकारच्या अध्यादेशामुळे ओबीसींवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जात असून ओबीसी आणि मराठा समाज आमने-सामने येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राज्य सरकारच्या २ सप्टेंबर रोजीच्या अध्यादेशानुसार कुणबी प्रमाणपत्र नेमकं कोणाला मिळणार? सरसकट कुणबी दाखले दिले जातील का? या सर्व विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच एकही नकली व्यक्ती ओबीसीमध्ये समाविष्ट होणार नाही, असं सांगत सरकारचा हा अध्यादेश ओबीसींवर गदा आणणारा नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

“मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारचा तो जीआर ओबीसींवर गदा आणणारा नाही. एकाही नकली व्यक्तीचा ओबीसींमध्ये समावेश होणार नाही, याची काळजी त्या जीआरमध्ये घेण्यात आलेली आहे. विजय वडेट्टीवार यांना तर याबाबत बोलण्याचा अधिकार नाही, कारण ओबीसींसाठी जे काही केलं ते आमच्या सरकारने केलेलं आहे. २०१४ ते २०२५ या काळात ओबीसींसाठी जे निर्णय झाले ते सर्व निर्णय ते आमच्या सरकारने घेतलेले आहेत”, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं.

“ओबीसींचं वेगळं मंत्रालय आणणारे आम्ही आहोत, ओबीसींसाठी योजना तयार करणारे आम्ही आहोत, महाज्योती तयार करणारे आम्ही आहोत, ओबीसींना ४२ वसतिगृह देणारेही आम्ही आहोत. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने ओबीसींचं राजकीय आरक्षण घालवलं, पण ते आरक्षण आम्ही परत आणलं. २७ टक्के पूर्ण ओबीसींचं आरक्षण परत आणणारं आमचं सरकार आहे. त्यामुळे ओबीसींना देखील हे माहिती आहे की त्यांचं हित पाहणारं कोण आहे. विरोधकांना फक्त राजकारण करता येतं. मात्र, आम्ही ओबीसी समाजाचं हित पाहतो. आम्ही मराठा समाजाचंही हित पाहतो. सर्व समाजाचं हित पाहणारं आमचं सरकार आहे”, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं.

कुणबी प्रमाणपत्र कोणाला मिळणार?

“मला असं वाटतं की जोपर्यंत दोन्ही समाजातील नेते खरी वास्तविकता काय आहे? हे समाजापर्यंत पोहोचवणार नाहीत तो पर्यंत दोन्ही समाजातील तेढ कमी होणार नाही. मी सांगतो की ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत, त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळेल. कुणबी नोंद नसेल तर कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही. त्यामुळे ओबीसी समाजाने चिंता करण्याची गरज नाही. पण ओबीसी आरक्षण संपलंय अशा प्रकारचं वातावरण तयार केलं जातंय, त्याचा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. दुसरीकडे टोकाचं राजकारण सुरू आहे. पण अशा प्रकारच्या राजकारणामुळे कधीही समाजाचं भलं होऊ शकत नाही. आम्ही समाजाची काळजी घेत आहोत”, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.