महाराष्ट्रातला सत्तास्थापनेचा पेच अद्यापही सुटलेला नाही. भाजपा, शिवसेना आणि इतर मित्रपक्षांच्या महायुतीने निवडणूक लढवली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली आणि त्यांनीही एकत्र येऊन निवडणूक लढवली. मात्र निकालाच्या दिवसापासून शिवसेनेने मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार अशी भूमिका घेतली. त्यानंतर अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावं अशीही आग्रही भूमिका घेतली. तसेच शिवसेनेच्या सगळ्याच आमदारांना रिट्रिट हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र याच हॉटेलमध्ये सुमारे ४० आमदार शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज झाले होते असं वृत्त आहे.

सुमारे ४० आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय शिवसेना का घेते आहे? असं म्हणत उद्धव ठाकरेंसमोर नाराजी व्यक्त केली होती. ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या बातमीनुसार, शरद पवारांवर विश्वास नाही असं अनेक शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. तसंच आम्हाला किती दिवस या हॉटेलमध्ये ठेवणार आम्हाला लवकरात लवकर घरी सोडा असंही त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे हे रिट्रिटवर पोहचले त्यांनी या सगळ्या आमदारांची समजूत घातली. एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंनीही या आमदारांची समजूत घातली आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्यावरुन अनेक आमदारांनी नराजी दर्शवली असल्याचं आता समजतं आहे. आता सगळे आमदार आपआपल्या मतदारसंघात परतले आहेत. मात्र रिट्रिट हॉटेलमध्ये असताना त्यांनी उद्धव ठाकरेंसमोर तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करण्याचा उद्धव ठाकरे यांचा निर्णय पटला नसल्याचं शिवसेनेच्या अनेक आमदारांनी सांगितलं.

ज्या पक्षांच्या विरोधात प्रचार करुन आपण निवडणूक जिंकलो, त्यांच्याचसोबत कसं काय जायचं ? असा प्रश्नही शिवसेना आमदारांनी उद्धव ठाकरेंना विचारला. रिट्रिट हॉटेलमधून आमदारांना त्यांच्या घरी पाठवण्याच्या एक दिवस आधी हे सगळं घडल्याचीही माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा- शरद पवारांची गुगली, म्हणाले सत्तास्थापनेबाबत त्यांनी त्यांचं बघावं

महाराष्ट्रातला सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही सुटलेला नाही. भाजपा आणि शिवसेना यांचा काडीमोड झाल्यानंतर राज्यावर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचं सरकार येणार का? हेदेखील काही ठरत नाही. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत अंतर्गतच या दोन पक्षांसोबत जाण्याबाबत एकमत नाही असं ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या बातमीवरुन स्पष्ट होतंय. त्यामुळे नेमकं महाराष्ट्रात काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.