दक्षिण सोलापूर तालुक्यातील बसवनगर येथे रविवारी सकाळी घरात सासू- सास-यांबरोबर सतत होणा-या भांडणामुळे वैतागून विधवा सुनेने स्वतःच्या दोन लहानग्या निष्पाप मुलींना चाकूने भोसकून ठार मारले आणि स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
भारती पप्पू राठोड (२४) असे या दुर्दैवी घटनेत गंभीर जखमी झालेल्या विधवेचे नाव आहे. तिला सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. काजल (७) आणि संध्या (४) अशी मातेकडून हत्या झालेल्या अभागी मुलींची नावे आहेत. या घटनेचे नेमके कारण लगेचच स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात जखमी विधवा मातेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी सुरू होती.
जखमी भारती राठोड हिचा पती पप्पू राठोड हा दोन वर्षांपूर्वी मरण पावला होता. भारती ही त्याची दुसरी पत्नी होती. पहिल्या पत्नीपासून पप्पू यास दोन मुली झाल्या होत्या. पहिली पत्नी माहेरी राहते. तर दुसरी पत्नी भारती ही आपल्या दोन्ही मुलींसह बसवनगर येथे सासरीच राहत असे. परंतु सासू व सास-याबरोबर विधवा सून भारती हिचा सतत वाद चालत असे. या सततच्या भांडणामुळे वैतागून भारती माहेरीही जाऊ शकत नव्हती. त्यामुळे सासरीच सतत भांडणतंटे सहन करीत ती आपल्या दोन्ही मुलींसह जीवन कंठत होती. मात्र सासरी भांडणे इतकी वाढत गेली की, त्यामुळे भारती ही आयुष्याला कंटाळली होती. त्यातूनच तिने दोन्ही निष्पाप मुलींना चाकूने भोसकून संपविले आणि नंतर त्याच चाकूने स्वतःलाही भोसकून घेतले, अशी प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Nov 2015 रोजी प्रकाशित
दोन मुलींची हत्या करून विधवा मातेचा आत्महत्येचा प्रयत्न
आत्महत्या करण्याचा प्रयत्न
Written by अपर्णा देगावकर

First published on: 23-11-2015 at 03:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Widow killed her two daughters and tried to commit suicide