चारित्र्याच्या संशयावरून व्यसनी पतीने सिलिंडर डोक्यात घालून पत्नीचा निर्घृण खून केला. शहरातील मुकुंदवाडी परिसरात रेल्वेरुळाजवळ स्वराजनगर येथे बुधवारी रात्री उशिरा हा भयानक प्रकार घडला. या प्रकारानंतर नराधम पती पळून गेला. सकाळी मृत महिलेजवळ तिच्या एक वर्षांच्या मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून तेथे जमलेल्या लोकांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती कळविली.
मीना राजेंद्र शेळके (वय ३५) असे या महिलेचे नाव आहे. तिचा पती राजेंद्र कारभारी शेळके (वय ३८, स्वराजनगर) हा घटनेनंतर पळून गेला. या दाम्पत्याला तीन मुले आहेत. या प्रकारामुळे ती पोरकी झाली आहेत.
आरोपी शेळकेला दारूचे व्यसन होते. तो मालमोटारीवर चालक म्हणून काम करीत होता. घटनेच्या रात्री तो दारू पिऊन तर्र्र झाला होता. रात्री उशिरा कधीतरी त्याने पत्नी मीनाच्या डोक्यात सिलिंडर घातले. या हल्ल्यात मीना जागीच ठार झाली. सकाळी हा प्रकार उघडकीस आला. मीनाचे वडील प्रभाकर दादाराव जौक (चिकलठाणा) यांनी मुकुंदवाडी पोलिसात फिर्याद दिली.