|| कल्पेश भोईर
पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात आल्याने रोजगाराचा प्रश्न:- तुंगारेश्वर अभयारण्याच्या चार किलोमीटर परिसराचे क्षेत्र पर्यावरणासाठी संवेदनशील क्षेत्र (इको सेन्सेटिव्ह झोन) जाहीर झाल्याने याचा परिणाम येथील स्थानिक भूमिपुत्र व गौणखनिज व्यावसायिकांवर होऊ लागला आहे. तुंगारेश्व परिसरातील २१ गावे या क्षेत्रात येत असल्याने येथील स्थानिकांचे परवाने रद्द करण्यात आल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वन्यजीव अभयारण्य व राष्ट्रीय उद्यानांच्या सभोवतालचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील अर्थात इको सेन्सेटिव्ह झोन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशानुसार केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने अधिसूचना काढून सर्व राज्यांना त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी तुंगारेश्वर अभयारण्य पर्यावरणासाठी संवेदनशील क्षेत्र जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र या निर्णयामुळे या क्षेत्रामध्ये गौणखनिज उत्खनन, वीटभट्टय़ा, दगड खाणी, दगड परवाने, मुरुम उत्खनन यावर बंदी घालण्यात आली आहे आणि यासाठी देण्यात आलेले परवाने रद्द करण्याचे आदेश वसईच्या प्रांताधिकाऱ्यांनी दिले आहेत.
पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामुळे स्थानिक भूमीपुत्रांचे मोठे नुकसान होणार आहे. या भागात सुरू असलेले व्यवसाय येथील भूमीपुत्रांचे पारंपरिक व्यवसाय आहेत यासाठी शासनाने योग्य तो मार्ग काढून भूमिपुत्रांना दिलासा द्यावा. अॅड्. दिनेश म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते