लोकसत्ता प्रतिनिधी
अहिल्यानगरः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी (ता. जामखेड) येथे होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न एकत्रितपणे मांडणार असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज सांगितले. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना विविध विभागांचे प्रस्ताव एकत्रित करण्याची सूचना केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जयंती महोत्सव वर्षानिमित्त राज्य मंत्रिमंडळाची बैठक दि. २९ एप्रिलला चौंडी येथे होणार आहे. या बैठकीपुढे जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मांडले जाणार असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी जिल्ह्याचे मुख्यालय म्हणून अहिल्यानगरमध्ये आणि अहिल्यादेवींचे जन्मगाव म्हणून चौंडी येथे अशा दोन्ही ठिकाणी विकास आराखडा राबविला जाणार असल्याची माहिती दिली. मात्र महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून उभारला जाणारा अहिल्यादेवींचा भव्य पुतळा अहिल्यानगर शहरात उभारला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील रस्ते, ज्ञानेश्वर सृष्टी, भुईकोट किल्ला, छत्रपती संभाजी महाराजांचे वास्तव्य असलेला पेडगाव किल्ला आदी प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मांडले जाणार आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय, पोलीस वसतिगृहाचे भूमिपूजन यावेळी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्याचा पर्यटन व औद्योगिक विकास आराखड्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीतून चालना देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
अहिल्यादेवींचे स्मारक अहिल्यानगर शहर की चौंडी येथे होणार याबद्दलची भूमिका स्पष्ट करताना पालकमंत्री विखे म्हणाले की स्मारक दोन्ही ठिकाणी झाले तर कुठे बिघडले? जिल्ह्याचे ठिकाण म्हणून अहिल्यानगर व जन्मगाव अशा दोन्ही ठिकाणी विकास आराखडे तयार केले जातील.