राज्याचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून (७ डिसेंबर) नागपूर येथे सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. मराठा आरक्षण, अवकाळी पाऊस यांसह राज्यातील विविधे मुद्दे या अधिवेशनासमोर ठेवण्यात येणार आहेत. २२ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेच्या आमदार अपात्रेचा निर्णयही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ३१ डिसेंबरपर्यंत द्यायचा आहे. त्यामुळे अधिवेशन काळात आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी होणार का यावर राहुल नार्वेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना माहिती दिली. दादरच्या चैत्यभूमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन देण्याकरता ते गेले होते.
राहुल नार्वेकर म्हणाले, सभागृहाचं कामकाज किंवा देश-राज्यात शासन चालवण्याचं काम डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाच्या आधारावरच चालतं. आजच्या पावन दिनी मी महाराष्ट्रातील जनतेला आश्वासित करू इच्छितो की संविधानाने दिलेल्या नियम आणि तरतुदींनुसारच हिवाळी अधिवेशनाचं कामकाज चालेल. संविधानाच्या तरतुदी आणि नियमांची कुठेही पायमल्ली होणार नाही. नियमांनुसार सभागृह चालवलं जाईल. सर्व आमदारही संविधानाची शपथ घेऊन सभागृहात काम करत असतात.
“शिवसेनेच्या १६ आमदार अपात्रते संदर्भातील निर्णय घेण्याचा प्रयत्न आहे. सर्वोच्च न्यायालयानेही ३१ डिसेंबरर्यंत निर्णय घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माझाही हाच प्रयत्न आहे. अधिवेशन काळात या अपात्रतेच्या याचिकेवर सुनावण्या घेऊन लवकरात लवकर निर्णय घेणार आहे. याप्रकरणी सातत्याने मॅरेथॉन सुनावणी घेतली गेली. आताही संविधान प्रणित तरतुदींनुसार कार्यवाही होईल”, असं राहुल नार्वेकर म्हणाले.
हेही वाचा >> उपराजधानीत थंडी, पण राजकीय तापमान वाढले,उद्यापासून अधिवेशन
हिवाळी अधिवेशनासाठी आमदार नागपुरात दाखल
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुरूवारपासून नागपुरात सुरू होत असून, त्यानिमित्ताने संपूर्ण मंत्रिमंडळ दोन आठवडे नागपुरात मुक्कामी असणार आहे. एकीकडे पावसाळी वातावरण आणि त्यामुळे तापमानात घट झाली असतानाच अधिवेशनात सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा संघर्ष रंगणार असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. अधिवेशनासाठी राज्यातील विविध पक्षांचे आमदार नागपुरात आले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आरोप प्रत्यारोप होणार आहे. विरोधी पक्ष नेते सत्ताधारी नेत्यांवर काय आरोप करतात आणि त्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काय उत्तरे देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री आज येणार
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेन गुरुवारपासून सुरू होत असून त्यासाठी उपराजधानी सज्ज झाली आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतरही मंत्री बुधवारी नागपुरात दाखल होत आहेत. नार्वेकर यांचे बुधवारी ६ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजता आगमन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी ३ वाजता येणार आहेत.