कोयना धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरूच असून, कृष्णा, कोयनाकाठी पावसाची उघडझाप कायम आहे. पाण्याचा कायम सुकाळ म्हणून लौकिक असणाऱ्या कोयना धरण क्षेत्रासह त्याखालील कृष्णा, कोयनाकाठी अपवाद वगळता चालू पावसाळी हंगामातील तब्बल एक महिना समाधानकारक पर्जन्यवृष्टीचा गेला आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत कोयना धरणाची पाणीपातळी ४६ फुटाने तर, पाणीसाठा जवळपास ३५ टीएमसीने जादा असून, धरण जवळपास दोन तृतीयांश भरले आहे.  
सध्या कोयना धरणाची पाणीपतळी २,१२६ फुट पाणीसाठा जवळपास ६७ टीएमसी म्हणजेच ६३.६५ टक्के आहे. कोयना धरणाच्या पाणीसाठय़ात चालू पावसाळी हंगामातील एक  महिन्यात भरघोस अशा ३८ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. धरणक्षेत्रात आजअखेर सरासरी २,०४०.३३ मि. मी. पावसाची नोंद असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा सव्वा दोनपट ज्यादा पाणीसाठा आहे. जवळपास तितकाच पाऊस झाल्याची आकडेवारी आहे. गतवर्षी आजमितीला मान्सूनच्या मुहूर्तावर ७ जूनला असलेल्या धरणाच्या पाणीसाठय़ात २.५२ टीएमसीची घट होताना पाणीपातळी २,०८० फूट ५ इंच, तर पाणीसाठा ३२.०८ म्हणजेच ३०.४७ टक्के होता. धरणक्षेत्रातील पावसाची सरासरी १,०१२.६६ मि. मी. पावसाची नोंद होती.
आज सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात कोयना धरण क्षेत्रातील कोयनानगर विभागात ४१ एकूण १९३६ मि. मी., महाबळेश्वर विभागात २३ एकूण २००० मि. मी., प्रतापगड विभागात ५७ एकूण २१२४ तर, नवजा विभागात सर्वाधिक  ४७ एकूण २१३६ तर, पावसाची नोंद आहे. आज दिवसभरात कोयनानगर १०, नवजा २६, तर महाबळेश्वर विभागात १३ मि. मी. पावसाची नोंद आहे. १०५.२५ टीएमसी क्षमतेच्या कोयना धरणाचा पाणीसाठा ६७ टीएमसी असून, पाणी पातळी २,१२६ फूट ५ इंच आहे. कराड तालुक्यात सरासरी एकूण १८० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर याच्या दुप्पट पाटण तालुक्यात धरण क्षेत्रातील नवजा व कोयनानगर वगळता उर्वरित दहा मंडलामध्ये एकूण ३६० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.