नंदुरबार जिल्ह्य़ात नोटाबंदीचा बळी; जनधन खात्याने अडचण

मका विकल्यानंतर बँकेत जमा केलेले पैसे मुलाच्या लग्नासाठी मिळत नसल्याने तालुक्यातील कलमाडी येथे महिलेने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच पालकमंत्री जयकुमार रावल यांनी मध्यस्थी करीत संतप्त शेतकऱ्यांची समजूत काढली.

कलमाडीच्या रहिवाशी मालुबाई मोतीलाल पाटील यांना मका विक्री करून मिळालेला ६० हजार रुपयांचा धनादेश त्यांनी बँक ऑफ बडोदामधील जनधन खात्यात जमा केला होता. मालुबाईंना मुलाच्या लग्नासाठी रक्कम लागणार होती. त्यांनी दोन दिवसांपूर्वी बँकेत जाऊन पैशाची मागणी केली. परंतु, त्यांचे जनधन खाते असल्याने नियमान्वये महिन्याला १० हजार रुपये देण्यात आले. लग्नाकरिता घर दुरुस्ती करावयाची असल्याने अधिक रक्कम देण्याची विनवणीही मालुबाईंच्या पतीने बँक अधिकाऱ्यांना केली होती. पैसे मिळत नसल्याचा तणाव तसेच सोसायटय़ांचे कर्ज यामुळे त्रस्त झालेल्या मालुबाईंनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

पार्थिव विच्छेदनासाठी नंदुरबारमध्ये आणण्यात आल्यावर संतप्त गावकऱ्यांनी संबंधित बँक अधिकाऱ्यांवर  कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. गरीब कुटुंबास आर्थिक मदत मिळावी आणि बँक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी गावकऱ्यांनी संबंधीत पार्थिव  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नेण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांना ही माहिती दिल्यानंतर त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

नंतर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणारे शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे यांच्याशी चर्चा करीत संबंधीत अधिकाऱ्यांवर चौकशीअंती कारवाईचे आश्वासन देत संबंधीत कुटुंबाला शासनाकडून सर्वेतोपरी मदतीचे आश्वासन दिल्यानंतर प्रकरण निवळले.