समाजात प्रतिकूल परिस्थितीत असामान्य कार्य करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळावे, पुढील कार्यासाठी त्यांना बळ मिळावे आणि इतरांना त्यांच्या कार्यापासून प्रेरणा मिळावी, या हेतूने भारतीय एकात्मता समितीची स्थानिक शाखा आणि फ्रावशी परिवार यांच्या वतीने अशा बारा महिलांना गौरविण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजता येथील महाकवी कालिदास कलामंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. गौरवार्थी महिलांची नावे थेट पुरस्कार सोहळ्यात जाहीर करण्यात येणार असल्याचेही समितीने म्हटले आहे.
समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी विलास पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. प्रख्यात अभिनेत्री रिमा लागू व रेणुका शहाणे यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. ‘असामान्य महिला पुरस्कार’ त्यांना देण्यात येणार असून मानपत्र आणि ११ हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
भारतीय एकात्मता समिती ही सेवाभावी स्वयंसेवी संस्था असून तीन दशकांपासून नाशिकमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोख्यासाठी कार्यरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विविध धर्मातील असामान्य महिलांना गौरविण्याचा निर्णय घेण्यात आला. एखाद्या जिद्दी व मेहनती स्त्रीचा जीवनप्रवास अडचणीवर मात करत, संकटांना न जुमानताा व दु:खाचा सामना करत सतत सुरू असतो. अशा स्त्रियांच्या संघर्षांतून व संग्रामातून येणाऱ्या संकटांना तोंड देण्याची स्फूर्ती इतरांना मिळते. अशा स्त्रियांचा जीवनप्रवास इतरांना माहीत व्हावा, या हेतूने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपापल्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रांतील महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यामध्ये शारीरिक, आर्थिक तसेच सामाजिक दुर्बलतेवर मात करून स्वबळावर यशस्वी होणाऱ्या महिला, पुरुषप्रधान क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटविणाऱ्या महिला, याशिवाय इतर क्षेत्रांमध्ये स्वकर्तृत्वावर पुढे येणाऱ्या महिलांचा त्यात समावेश आहे.
समितीने केलेल्या आवाहनानुसार त्यांच्याकडे विविध क्षेत्रांतील ३५ महिलांचे अर्ज आले. त्यातून फ्रावशी अकॅडमीच्या उपाध्यक्षा शर्वरी लथ, ज्येष्ठ पत्रकार वंदना अत्रे, प्रा. वृंदा भार्गवे यांचा समावेश असलेल्या निवड समितीने सन्मानपात्र बारा महिलांची निवड केली आहे. या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान होताना त्यांच्या कार्याची चित्रफीतही दाखविली जाणार आहे. हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्याचा निर्णय भारतीय एकात्मता समिती व फ्रावशी अकॅडमीने घेतला आहे. कार्यक्रमास नाशिककरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे उपाध्यक्ष रतन लथ, ज्येष्ठ संपादक वंदन पोतनीस, समिती सचिव जे. पी. जाधव यांनी केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Dec 2012 रोजी प्रकाशित
भारतीय एकात्मता समितीतर्फे आज महिला गौरव सोहळा
समाजात प्रतिकूल परिस्थितीत असामान्य कार्य करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळावे, पुढील कार्यासाठी त्यांना बळ मिळावे आणि इतरांना त्यांच्या कार्यापासून प्रेरणा मिळावी, या हेतूने भारतीय एकात्मता समितीची स्थानिक शाखा आणि फ्रावशी परिवार यांच्या वतीने अशा बारा महिलांना गौरविण्याचा निर्णय घेतला आहे.
First published on: 17-12-2012 at 01:29 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women honored programme from social trust