बाकरे यांच्या काष्ठ शिल्पाकृतीत कला-विज्ञानाचा अद्भुत संगम!

कै. बाकरे १९९४ मध्ये एका कार्यशाळेसाठी या महाविद्यालयात आले होते.

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार व शिल्पकार कै. सदानंद बाकरे यांनी कला आणि विज्ञानाचा अद् भूत संगम घडवत साकारलेली अनोखी काष्ठ शिल्पाकृती सावर्डे येथील सह्याद्री स्कूल ऑफ आर्टतर्फे आयोजित प्रदर्शनात रसिकांसाठी मांडण्यात आली आहे.

विज्ञानातील गुरुत्वमध्याच्या तत्त्वावर आधारित अशी ही घोड्याच्या नालाच्या आकारातील काष्ठ  शिल्पाकृती केवळ एका काचेच्या बाटलीवर तोललेली आहे. या शिल्पाकृतीची लांबी सुमारे २२ फूट असून दोन टोकांमधील अंतर सुमारे ९ फूट आहे.

कै. बाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सह्याद्री शिक्षण संस्थेच्या या कला महाविद्यालयातर्फे खास स्पर्धा आणि चित्र-शिल्प प्रदर्शन भरवण्यात आले. त्यामध्ये ही काष्ठ शिल्पाकृती आवर्जून मांडलेली आहे. कै. बाकरे १९९४ मध्ये एका कार्यशाळेसाठी या महाविद्यालयात आले होते. त्या वेळी भवताली पडलेल्या लाकडाच्या जाड पट्ट्या एकमेकांवर ठोकून त्यांनी काही तासांत ही कलाकृती साकारली, अशी  माहिती जन्मशताब्दी सोहळ्याचे संयोजक ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रा.प्रकाश राजेशिर्के यांनी दिली. आंतरराष्ट्रीय कला क्षेत्रात या शिल्पाकृतीचे मूल्य एक कोटी रुपयांच्या घरात जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

   यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात चित्रकार संजय सावंत यांनी सांगितले की, १९९४ साली याच कला महाविद्यालयाने आयोजित केलेल्या चित्र-शिल्प कार्यशाळेमध्ये मीही सहभागी होतो. त्यावेळी बाकरेसरांच्या या अर्धगोलाकार कायनेटिक स्कल्प्चरच्या कामात त्यांचा सहाय्यक म्हणून काम करत होतो. विज्ञान आणि गणित यांची शास्त्रशुद्ध जोड असल्यामुळे ही कलाकृती जगप्रसिद्ध ठरलेली आहे. बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे उत्तम कला कारकिर्दीबद्दल दिला जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्काराचे कै. बाकरे पहिले मानकरी होते, असे सोसायटीचे अध्यक्ष प्रा. नरेंद्र विचारे यांनी सांगितले.

या प्रदर्शनामध्ये कला महाविद्यालयाने बाकरे सरांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या चित्र-शिल्प इत्यादी कलांमधील आयोजित केलेल्या स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त कलाकारांच्या कलाकृती मांडलेल्या आहेत. या प्रदर्शनानिमित्त कलामहाविद्यालयाच्या पावसाळी शैक्षणिक सहलीच्या चित्रांचेही प्रदर्शन मांडलेले आहे.

प्रदर्शनाचे आकर्षण

भारतातील प्रोग्रेसिव आर्टिस्ट ग्रुपचे कै. बाकरे प्रमुख संस्थापक सदस्य होते. त्यांच्या समकालीन प्रसिद्ध चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सुझा, चित्रकार मकबूल फिदा हुसेन, चित्रकार सय्यद हैदर रझा, चित्रकार कृष्णाजी हौळाजी आरा, चित्रकार हरी अंबादास गाडे अशा भारतीय कलावंतांमध्ये बाकरे हे एकमेव चित्रकार-शिल्पकार होते. या प्रदर्शनात त्यांच्या या शिल्पा बरोबर इतर दोन माध्यमातील चार कलाकृती मांडण्यात आलेल्या आहेत. तसेच शिल्पकार संजय तडसरकर यांनी साकार केलेल्या बाकरे यांच्या व्यक्तीशिल्पाची व चित्रकार सावंत यांनी साकार केलेल्या त्रिमितीय  चित्राकृतीचीही मांडणी केलेली आहे. या सर्व चित्र शिल्पाकृती या प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Wonderful confluence of art and science in bakre wood sculpture akp

ताज्या बातम्या