मराठवाडय़ातून केले होते अपहरण

सोलापूर : ऊसतोड मजुरांच्या टोळ्या आणण्याकरिता उचल म्हणून दिलेली आठ लाखांची रक्कम वसूल करण्यासाठी ऊसतोड मजूर टोळीच्या मुकादमाचे अपहरण करून त्याचा खून केल्याप्रकरणी दोघा जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे हा प्रकार घडला.

राधेशाम प्रल्हाद राठोड (वय ३२, रा. बेलोरा, ता. मंठा, जि. जालना) असे खून  झालेल्या मुकादमाचे नाव आहे. त्याची पत्नी शिल्पा राठोड हिने या संदर्भात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार भीमराव दिगंबर कौलगे आणि अभिमान नवनाथ शिंदे (दोघे रा. पिराची कुरोली) यांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत. पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामासाठी ऊसतोड करून आणण्याकरिता मराठवाडय़ातील ऊसतोड मजुरांच्या टोळ्या मागविण्यात आल्या होत्या. त्यापैकी मृत राधेशाम राठोड या ऊसतोड मजूर टोळीच्या मुकादमाला भीमराव कौलगे व अभिमान शिंदे यांनी ऊसतोड मजुरांच्या टोळ्या आणण्यासाठी आठ लाखांची रक्कम उचल म्हणून दिली होती. कारखान्याचा गाळप हंगाम सुरू होताना हा व्यवहार झाला होता. परंतु ऊसतोड मजुरांच्या टोळ्या आल्या नाहीत. आलेल्या टोळ्या पुन्हा परत गेल्या. त्यामुळे घेतलेली आठ लाखांची उचल परत मिळण्यासाठी भीमराव कौलगे व अभिमान शिंदे या दोघांनी मृत राधेशाम राठोड याच्या मागे लकडा लावला होता. घेतलेली उचल परत देत नाही म्हणून ते राधेशामवर चिडून होते.

म्याच कारणावरून कौलगे व शिंदे हे दोघे मृत राधेशामच्या गावी बेलोरा (जि. जालना) येथे आले. त्यांनी राधेशाम व त्याच्या कुटुंबीयास गोड बोलून काही रक्कम पंढरपुरातून मिळवून देतो, अशी थाप मारून त्याला पळवून नेले. आठ लाख रुपये दे, नाही तर आमच्याबरोबर चल, अशा शब्दात त्यांनी दमदाटीही केली होती. शेवटी त्याला पळवून पंढरपुरात पिराची कुरोली येथे आणले. तेथे अभिमान शिंदे याच्या शेतात आणून त्याला डांबून ठेवले. नंतर चिडून गळफास देऊन त्याचा खून केला. त्याचा मृतदेह बाभळीच्या झाडाला लटकावला, असे फिर्यादीत म्हटले आहे.