ई-ऑफिस कार्यप्रणालीत लोकप्रतिनिधींची माहिती देण्यात आली आहे, त्यात राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांना काँग्रेसचे आमदार म्हटले आहे. तसेच आमदार प्रमोद जठार व आमदार दीपक केसरकर यांचे साधे फोन नंबरही देण्याचे टाळण्यात आल्याचे साइटवर दिसत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी ई-ऑफिस कार्यप्रणालीचा शुभारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते थाटात नुकताच केला.
ई-ऑफिसमध्ये प्रत्येक विभागाची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. त्यात लोकप्रतिनिधी हा एक विभाग आहे. खासदार नीलेश राणे यांना प्रथम स्थान तर त्याखाली पालकमंत्री नारायण राणे यांचे नाव आहे.
आमदार दीपक केसरकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले आहेत. पण त्यांच्या नावासमोर ते काँग्रेसचे आमदार असल्याचे नोंदविले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळाचे पदसिद्ध सदस्य व विधानसभा सदस्य असणाऱ्या आमदार प्रमोद जठार व आमदार दीपक केसरकर यांचे फोन नंबरही देण्यात आलेले नाहीत. लोकप्रतिनिधींचीच अपुरी माहिती देण्याचा उद्योग करण्यामागचे कारण समजले नाही.
ई-ऑफिस कार्यप्रणाली चाळताना अनेकांना ही बाब खटकली, महसूल विभागाच्या कोणाही अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात कशी काय आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.