कर्जाचा डोंगर असल्याने आत्महत्या करणारे शेतकरी शंकर चायरे यांच्या मुलीने यवतमाळ पोलिसांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात तक्रार दाखल केली आहे. माझ्या वडिलांच्या आत्महत्येसाठी केंद्र व राज्य सरकारचे धोरण कारणीभूत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रामुख्याने जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात माझ्या वडिलांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करावा, असा तक्रार अर्ज जयश्री शंकर चायरेने पोलिसांना दिला आहे. गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, असा इशाराच जयश्रीने दिला आहे.
यवतमाळमधील शंकर चायरे (वय ४२) यांनी मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. चायरे हे घाटंजी तालुक्यातील राजूरवाडीचे रहिवासी होते. त्यांच्यावर बँकेचे ९५ हजार रुपयांचे कर्ज होते. शंकर चायरेंच्या पश्चात पत्नी मंगला, महाविद्यालयात पदवी शिक्षण घेत असलेल्या भाग्यश्री, जयश्री व धनश्री या तीन मुली व नवव्या इयत्तेत शिकत असलेला आकाश हा मुलगा असा परिवार आहे.
जयश्री चावरेने घाटंजी पोलीस ठाण्यात वडिलांच्या आत्महत्येप्रकरणी तक्रार अर्ज दिला आहे. ‘माझ्या वडिलांनी आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत माझ्या आत्महत्येसाठी नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचा उल्लेख केला आहे. माझ्या वडिलांवर भरपूर कर्ज होते. याशिवाय आमच्या चार भावडांची शिक्षणाची जबाबदारीही त्यांच्यावर होती’, असे तिने तक्रार अर्जात म्हटले आहे. या वर्षी काहीच कापूस झाला नाही. त्यामुळे वडील चिंतेत असायचे. अंगावर भरपूर कर्ज असल्याने ते नैराश्यात होते. माझ्या वडिलांच्या मृत्यूसाठी केंद्र व राज्य सरकार जबाबदार आहे. नरेंद्र मोदींविरोधात भारतीय दंड विधानानुसार गुन्हा दाखल करावा आणि माझ्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, असेही जयश्रीने तक्रार अर्जात म्हटले आहे.
पोलिसांनी तक्रार अर्ज स्वीकारला आहे. या प्रकरणी तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरीकडे चायरे कुटुंबीयांनी अद्याप शंकर चायरे यांचा मृतदेह स्वीकारलेला नाही. गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही, असा इशारा चायरे यांच्या मुलींनी दिला आहे. चायरे यांचा मृतदेह यवतमाळमधील वैद्यकीय रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आला आहे.