यवतमाळमधील नेर तालुक्यातील शिवसैनिक पावसामुळे पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी रस्त्यावर उतरल्याचे समोर आले आहे. तर, या प्रकरामुळे राज्यातील ठाकरे सरकारला या शिवसैनिकांकडून एकप्रकारे घरचा आहेरच दिला गेल्याचं बोललं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कपाशी, सोयाबीन, तूर, उडीद, मूग पिक हातातून गेले असून, शेतकरी संकटात आहे. या नुकसानामुळे कर्जाचा बोजा आणखीच वाढणार आहे. करोना काळात शेतकर्‍यांना मोठ्याप्रमाणावर नुकसान सोसावे लागले. कर्ज, उसनवारी करून शेतकर्‍यांनी पेरणी केली. सुरुवातीला पीक-पाणी चांगले होते. मात्र, पावसामुळे होत्याचे नव्हते झाले. राज्य सरकारने शेतकर्‍यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन नेर तालुक्यातील शिवसेना तालुका प्रमुख मनोज नाल्हे, दीपक आडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकार्‍यांमार्फत पाठविले आहे.

तर, शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, शेतकऱ्यां न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे. अशा घोषणा दिल्या. यावेळी त्यांच्या हाती मागण्यांचे फलक व झेंडे देखील होते.

नुकसानीची माहिती शासनाला देण्यासाठी आम्ही तहसील कार्यालयात आलो – ‘

‘नेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती शासनाला देण्यासाठी आम्ही तहसील कार्यालयात आलो आहोत. सततच्या पावासाने कृषी व्यवसाय डबघाईला आलेला आहे. शेतकरी अतिशय संकटात सापडलेला आहे. त्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आपल्या हक्काच्या सरकारला माहिती देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत. शेतीचं नुकसान झालेलं आहे, परंतु किती प्रमाणात झालं? काय झालं? याचा डाटा इथे तयार नाही. म्हणून आम्ही शिवसैनिकांच्या माध्यामातून प्रत्येक गावात शेतकऱ्यांचं नाव, त्यांचा सर्वे नंबर, क्षेत्रफळ, शेतातील पीक आणि झालेलं नुकसान याबाबतची माहिती आम्ही इथे जमा केली आहे. ही सर्व माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी नेर तहसीलला आलो आहोत. जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळू शकेल. या निवेदनाचा मुख्यमंत्री विचार करतील आणि तालुक्याला भरघोस मदत करतील अशी आम्ही आशा व्यक्त करतो.” असं शिवसेना तालुका प्रमुख मनोज नहल्ले यांनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yavatmal shiv sainiks on the streets for various demands msr
First published on: 05-10-2021 at 18:49 IST