योगगुरू रामदेव बाबा हे अनेकदा त्यांच्या राजकीय भूमिकांमुळे चर्चेत किंवा वादात सापडल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यांनी काळ्या पैशांविषयी केलेल्या विधानाचीही चर्चा झाली होती. यानंतर आता पुन्हा एकदा रामदेव बाबा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी महिलांच्या कपड्यांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे ते अडचणीत सापडले असून थेट राज्य महिला आयोगाने यासंदर्भात रामदेव बाबांना नोटीस पाठवली आहे. विशेष म्हणजे रामदेव बाबांनी हे विधान केलं, तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसही उपस्थित होत्या. त्यामुळे या प्रकरणाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होताना पाहायला मिळत आहे.

काय म्हणाले होते रामदेव बाबा?

शुक्रवारी रामदेव बाबांनी ठाण्यात घेतलेल्या योग शिबिरामध्ये हा सगळा प्रकार घडला. यावेळी अमृता फडणवीसांच्या उपस्थितीत रामदेव बाबांनी हे विधान केल्यामुळे त्यावरून राजकीय चर्चाही झडू लागल्या आहेत. “अमृता फडणवीस पुरेसे अन्न खातात. पुढील शंभर वर्षं त्या म्हाताऱ्या होणार नाहीत. कारण, त्या नेहमी आनंदी राहतात. जसा आनंद अमृता फडणवीस यांच्या चेहऱ्यावर आहे, तसाच तुमच्या चेहऱ्यावर पाहायचा आहे”, असं रामदेव बाबा म्हणाले.

Video: “राज्य सरकारनं जीभ दिल्लीला…”, महिलांच्या कपड्यांविषयी रामदेव बाबांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा सवाल!

यानंतर पुढे बोलताना त्यांनी, “महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात”, असं आक्षेपार्ह विधान केलं आणि वादाला सुरुवात झाली.

दरम्यान, या सगळ्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. यासंदर्भात येत्या दोन दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश आयोगाने रामदेव बाबांना दिल्याचं आयोगाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटलं आहे.

“ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना बाबा रामदेव यांनी महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारं अभद्र विधान केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची तक्रार आयोगाच्या कार्यालयाला प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग या तक्रारीची दखल घेऊन रामदेव बाबांच्या विधानाचा तीव्र शब्दांत विरोध करत आहे. त्यामुळे रामदेव बाबांना पुढच्या दोन दिवसांत त्यांच्या वक्तव्याचा खुलासा करण्याचे निर्देश आयोग देत आहे”, असं आयोगानं ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊतांचं टीकास्र!

दरम्यान, रामदेव बाबांच्या विधानावरून संजय राऊतांनी अमृता फडणवीस आणि शिंदे सरकार यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. “रामदेव बाबांनी असं लज्जास्पद विधान केलं असताना तिथे उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी उपस्थित असल्याचं मला समजलं. असं विधान केल्यानंतर आमच्या अमृता वहिनी गप्प कशा बसल्या? असं विधान करणारा कुणीही कितीही मोठा असो, त्याच्या सणसणीत कानाखाली बसायला पाहिजे”, असं संजय राऊत म्हणाले.