मनोबल, कर्तव्याची जाणीव, परिपक्व विचारशक्ती आणि प्रसंग ओळखून निर्णय घेण्याची क्षमता वाढविण्यातून अत्याचारांना प्रतिबंध करणे शक्य होऊ शकते, असे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक वैशाली माने यांनी ‘महिलांवरील अत्याचार व त्यांना प्रतिबंध’ या विषयावरील महावीर महाविद्यालयात मैत्रीण व्यासपीठातर्फे आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले. याप्रसंगी अग्रणी महाविद्यालय योजना समन्वयक प्रा. डॉ. मंजिरी देसाई यांची उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. संभाजीराव कणसे अध्यक्षस्थानी होते.    
कार्यशाळेच्या समन्वयक प्रा. डॉ. रूपा शहा यांनी प्रास्ताविकात कार्यशाळा आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात स्वयंसिद्धाच्या कार्यकर्त्यां तृप्ती पुरेकर यांनी अत्याचारित महिलादेखील ताठ मानेने स्वावलंबी कशा होऊ शकतात याची उदाहरणे देत व्यवसाय संधींबाबत मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात अ‍ॅड. सुलक्ष्मी पाटील यांनी महिलांवरील अत्याचार व कायदे याबाबत माहिती दिली. तिसऱ्या सत्रात विनय चोपदार यांनी नि:शस्त्र असताना अत्याचार करू पाहणाऱ्या व्यक्तीला कशा पद्धतीने प्रतिबंध करता येऊ शकतो याबाबतची प्रात्यक्षिके उपस्थित विद्यार्थिनींकडून करून घेत स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले. सूत्रसंचालन प्रा. संध्या जाधव यांनी केले. दीक्षा कुरणे, नेहा काशिद यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.