देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचे नाव बदलण्यात आले आहे. खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचं नाव देण्यात आले आहे. यासाठी देशभरातून लोकांच्या विनंत्या येत होत्या त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. दरम्यान विरोधक मोदींवर टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ‘खेलरत्न’च्या नामांतरणावरुन मोदींना टोला लगावला आहे.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, “जनतेची मागणी होती म्हणून नरेंद्र मोदींनी खेलरत्न पुरस्कारांचं नाव बदलले, हे चांगल आहे पण जनतेच्या अजूनही काही छोट्या छोट्या मागण्या आहेत. यामध्ये महागाई कमी करा, युवकांना रोजगार द्या, महिलांना सुरक्षा द्या, शेतकऱ्यांना सन्मान द्या आणि राजीनामा द्या”

गांधी द्वेषातून पुरस्काराच्या नावात बदल

केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नेहरु-गांधी नावाचा प्रचंड तिरस्कार आहे. या तिरस्काराच्या मानसिकतेतूनच त्यांच्या नावाने असलेल्या योजना, प्रकल्पाची नावे बदलण्याचे काम मोदी सरकार करत आहे. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचे नाव बदलण्याची कृतीसुद्धा त्याच गांधी नावाच्या द्वेषातूनच आलेली आहे. मोदी सरकारच्या या कोत्या मनोवृत्तीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

संजय राऊत म्हणाले…

“मेजर ध्यानचंद हे महान खेळाडू आहेत. ते हॉकीचे जादूगार होते. सरकारने त्यांच नाव दिलं आहे. पण वारंवार एखाद्या योजनेची नावं बदलणं आणि त्यातून काय मिळवायचं आहे हे सरकारला माहिती आहे. ध्यानचंद यांच्या नावाला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यावर टीका टिपणी होऊ नये,” असं संजय राऊत यांनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटलं आहे.