हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग– गरज ही शोधाची जननी असते असे म्हणतात. याच गरजेतून तळा तालुक्यातील एका तरुणाने चक्क बॅटरीवर चालणारी जीप तयार केली आहे. टाकाऊ वस्तूंपासून बनवलेली ही जीप सध्या सर्वाच्या कुतूहलाचा विषय ठरत आहे.

तळा येथील विराज टिळक हे केबल व्यवसाय करतात. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना सतत प्रवास करावा लागतो; पण इंधनाच्या वाढत्या दरामुळे त्यांना हा प्रवास खर्चीक ठरू लागला होता. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलशिवाय चालणारे एखादे वाहन आपल्याकडे असवा अशी गरज त्याला सातत्याने भासू लागली; पण बाजारात बॅटरीवर चालणाऱ्या गाडय़ांचा पर्याय उपलब्ध होता. पण त्या गाडय़ा महागडय़ा होत्या. हा खर्च परवडणारा नसल्याने त्याने स्वत:च बॅटरीवर चालणारी गाडी बनविण्याचा निर्णय त्याने घेतला. 

गावातील भंगारवाल्यांकडून टाकाऊ सामान गोळा केले. वेिल्डग मशिन, ड्रिल मशीन, कटर आणि रिबिट मशीन मित्रांकडून आणले. काही मित्रांनी या कामात लागेल ते सहकार्य देण्याचे मान्य केले. जुन्या मोडलेल्या गाडय़ांच्या सामानाची जुळवाजुळव केली. सात दिवसांनी गाडी बनविण्याचे काम सुरू केले. दोन-तीन प्रयत्न फसले; पण जिद्द सोडली नाही. पुन्हा जोमाने काम सुरू केले. मग मात्र यश मिळाले. स्टीअरिंग, सस्पेन्शन, पिक-अप, रिव्हर्स गिअरची चाचणी केली. ती यशस्वी झाली. 

या गाडीसाठी चार बॅटरींचा वापर करण्यात आला आहे. एकदा चार्ज केलेली गाडी साधारणपणे ७० ते ८० किलोमीटर धावते आहे. ३० किलोमीटर ताशी वेगाने ही गाडी प्रवास करू शकते आहे. गाडी चार्जिगसाठी दिवसाला २५ ते ३० रुपयांचा खर्च येतो आहे. 

विराज आणि त्याच्या साथीदारांनी तयार केलेली ही गाडी सध्या सगळय़ांसाठी कुतूहलाचा विषय ठरली आहे. इंजिनीअरींग कॉलेजचे विद्यार्थीही त्याची ही गाडी पाहण्यासाठी तळय़ात दाखल होत आहेत.

इंधनाचे दर वाढले आहेत. बाजारात बॅटरीवर चालणारी जी वाहने उपलब्ध आहेत ती सर्वसामान्यांच्या आवाक्यातील नाहीत. त्यामुळे मी आणि माझ्या मित्रांनी ही गाडी बनवण्याचा निर्णय घेतला. तो भलताच यशस्वी ठरला. आगामी काळात अशा अजून गाडय़ा बनविण्याचा आमचा मानस आहे. यासाठी शासनाने प्रोत्साहन द्यावे.

– विराज टिळक, गाडी तयार करणारा