लोकसत्ता ऑनलाइन, वर्धा
लग्न हा एका मुलीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा अशतो. आप्तपरिवाराच्या साक्षीने हा मंगल प्रसंग आनंदात साजरा व्हावा अशी प्रत्येक मुलीची इच्छा असणं स्वाभाविक आहे. पण अनेकदा अनाथ मुलींच्या आयुष्यात हा सुखाचा क्षण येत नाही. पण वर्ध्यात एका अनाथ मुलीच्या लग्नासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेत तिची इच्छा पूर्ण केल्याची घटना समोर आली आहे.

वर्धा येथे बुध्दविहारालगत राहणाऱ्या रूचिता उके हिच्या आयुष्यातील हा प्रसंग आयुष्यभर तिच्या आठवणीत राहील. रूचिता उके हिच्या आईचे दोन महिन्यापूर्वीच निधन झाले होते. वडील विकलांग आहेत. धुणीभांडी करीत रूचिताला व तिच्या लहान भावाला सांभाळणाऱ्या आजीच्या हिंमतीवरच गाडा सुरु आहे. दोन मोठय़ा बहिणींची लग्न झाली आहेत. परंतू त्यांच्याकडून काही कारणास्तव मदत मिळणे शक्य नव्हते.

परिस्थितीमुळे दहावीनंतर रूचिता उकेने शिक्षण सोडले. मुलीची लग्नगाठ बांधावी व जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी आजीची लगबग सुरु होती. पण मदत करण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते. या परिसरातच राहणाऱ्या संगिता डंभारे यांनी तिच्यासाठी स्थळ शोधून आणले. तळेगाव टालाटूले येथील हर्षल भाकरे हा शेतमजूर रूचिता उकेशी लग्न करण्यास तयार झाला. त्यानेही मन मोठे करीत आपल्याच गावात लग्नसोहळा करण्याची तयारी दर्शवली. मुलीकडून काही नको. तिची किमान तयारी करून पाठवा, असे त्याचे सांगणे होते.

मग मुलीच्या तयारीसाठी मोहित सहारे व जय उके यांनी धावपळ सुरू केली. सामाजिक कार्यकर्ता असणाऱ्या मोहितला समाजसेवेत सक्रीय असणाऱ्या नीता जानी यांचा परिचय होता. त्यांना कल्पना देण्यात आली. मुलीसाठी किमान एक साडी, एक ड्रेस, मेकअपचे सामान तसेच घरगुती स्वयंपाकासाठी किराणा ही अपेक्षा ठेवण्यात आली. नीता जानी यांनी त्यांच्या सहकारी सोनाली श्रावणे, योगिता मानकर यांची मदत घेवून पैसे गोळा केले आणि लग्नाच्या तयारीचा मार्ग मोकळा झाला.

वर्धा येतून वऱ्हाड तळेगावला नेण्यासाठी गावातीलच रवींद्र कोटंबकार यांनी गाडी उपलब्ध करून दिली. मदतीने गहिवरलेल्या आजीच्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हते. अखेर आपल्या नातीचे वऱ्हाड घेवून त्या तळेगावला पोहोचल्या. बुद्धविहारात लग्नाचे सोपस्कार पार पडले. या सोहळय़ास गावकऱ्यांचेही सहकार्य लाभले. लग्नासाठी खटाटोप करणारा मोहित म्हणतो मदतीचा कौटुंबिक हात नसताना हे लग्न पार पडले. समाजात सहकार्य करणारे असतातच याची प्रचिती आली. माझे सहकारी अंकित बारंगे, पंकज गावंडे, तेजस ठाकरे, तन्मय मेश्राम यांची साथ मिळाली अन् एका गरिब मुलीच्या नव्या आयुष्यास सुरूवात झाली.