लग्न करावे अन्यथा तीन लाख रुपये द्यावे, याकरिता महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडून सातत्याने धमकाविले गेल्यामुळे वैतागून हळदीच्या दिवशीच एका तरुणाने शनिवारी सकाळी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या तरुणाच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवरून पोलिसांनी चार महिला पोलिसांसह एकूण नऊ जणांविरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दीपक बर्वे (रा. माडसांगवी) असे या तरुणाचे नाव असून तो मनमाडच्या रेल्वे कार्यशाळेत शिपाई म्हणून कार्यरत होता. पोलीस दलाच्या भरतीवेळी दीपकची मनीषा कुजोरे या पोलीस महिलेशी ओळख झाली. उभयतांमध्ये पुढे मैत्री झाल्यावर संबंधित महिलेने त्याला लग्न करण्याची गळ घातली. परंतु, दीपक त्यास तयार झाला नाही. दरम्यानच्या काळात त्याचे लग्न निश्चित झाले. ही बाब कुजोरे यांना समजल्यानंतर त्यांनी आपल्या काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने त्याला धमकाविणे सुरू केले. लग्न करावे किंवा तीन लाख रुपये द्यावे अन्यथा पोलीस कारवाई करण्याची धमकी संबंधितांनी दिल्याचे दीपककडे सापडलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. चार महिला पोलीस कर्मचारी व कुजोरे यांच्या कुटुंबियांकडून दीपकचे लग्न मोडण्याची धमकी दिली जात होती. या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्येचा निर्णय घेत असल्याचे दीपकने म्हटले आहे. शनिवारी सकाळी मांडसांगवी येथे रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी मनीषा कुजोरे, सारिका जाधव, ज्योती गोसावी, स्वाती जगताप या महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह सुनिता कुजोरे, कल्पना कुजोरे, लीला कुजोरे आदी नऊ जणांविरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth suicide after female police threatening
First published on: 02-06-2013 at 01:31 IST