युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे सध्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने राज्यभर दौरा करत आहेत. यावेळी आदित्य जनतेशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान लातूरमध्ये मात्र आदित्य ठाकरे चक्क नांगर हातात घेऊन शेतात पेरणी करताना दिसले. याआधी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांचे शेतीप्रश्न जाणून घेतले. यानंतर आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतात काम करण्याचा अनुभव घेतला. त्यांनी शेतकऱ्यासोबत मिळून शेतात पेरणीदेखील केली.

उदगीर येथे संवाद साधताना त्यांनी ही यात्रा निवडणुकीसाठी नाही, प्रचारासाठी नाही, मतं मागण्यासाठी सुद्धा नाही. वेगवेगळ्या विषयांवरती महाराष्ट्राचे मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी आहे असं सांगितलं. “शिवसेना हा एकमेव पक्ष असा आहे की प्रचाराआधी आणि प्रचारानंतर सत्तेत असताना किंवा सत्तेत नसताना देखील जनतेमध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतो”, असंही त्यांनी म्हटलं.

“महाराष्ट्राच्या जनतेने देश भगवा केला महाराष्ट्र भगवा केला. तुमचे मत मागायला नाही तर तुमचे आभार मानण्यासाठी मी आज येथे आलेलो आहे. मी जी वचने तुम्हाला आधी दिलेली आहेत ती मी पूर्ण करणार म्हणजे करणारच”, असं आश्वासन यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिलं. “तुम्ही जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे आणि तुम्हाला जी वचन आम्ही दिलेली आहेत ती पूर्ण करणं ही आमची जबाबदारी आहे”, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझ्या आजोबांनी मला शिकवले आहे की जनता ही खरा देव असते त्यांचे आशीर्वाद पहिल्यांदा घेतले पाहिजेत. जो व्यक्ती माझे काम करू शकतो त्यांना लोक निवेदने देतात. मी माझे सौभाग्य समजतो की लोक मला रस्त्यात थांबवून निवेदने देतात”, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. “माझ्या स्वप्नातला आणि तुमच्या मनातला नवा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. दुष्काळ मुक्त महाराष्ट्र, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र, बेरोजगार मुक्त महाराष्ट्र असा मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे”, असा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला. “शिवसेनेच्या आंदोलनानंतर लगेचच 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना विमा कंपन्यांचे पैसे मिळायला सुरुवात झाली”, असंही यावेळी त्यांनी सांगितलं.