तबलानवाज उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबलावादनाची मफील अनुभवण्याची संधी अलिबागकरांना मिळाली आणि या कार्यक्रमात अलिबागकर अक्षरश: मंत्रमुग्ध झाले.
झाकीर हुसेन यांचा रायगड जिल्ह्य़ातील हा पहिलाच कार्यक्रम होता. निमित्त होते मफील या सांस्कृतिक संस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात उस्ताद झाकीर हुसेन यांना सारंगीवर साथ दिली साबीर खान यांनी. या कार्यक्रमास हजारो अलिबागकर रसिकांनी हजेरी लावली होती. हुसेन यांच्या तबलावादनाने रसिक अगदी मंत्रमुग्ध झाले होते. त्यांनी झाकीर हुसेन यांच्या प्रत्येक पेशकशला मनमुराद दाद दिली. अलिबागकर रसिकांनी दिलेली दाद पाहून ते गहिवरून गेले. आपण पहिल्यांदाच येथे आलो, असे जाणवलेच नाही, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अलिबागच्या रसिकांचा प्रतिसाद पाहता आपल्याला इथे पुन:पुन्हा यायला आवडेल, असे ते म्हणाले. त्यांनी अलिबागकरांना शुभेच्छाही दिल्या.
गेले दोन दिवस कुरूळ येथील आरसीएफ शाळेच्या प्रांगणात मफीलचा सांगीतिक उत्सव सुरू होता. त्याची सांगता झाकीर हुसेन यांच्या तबलावादनाने झाली. झाकीर हुसेन यांची मफल अलिबागमध्ये करण्याचे आमचे २५ वर्षांपासूनचे स्वप्न होते. रौप्य महोत्सवी वर्षांत ते पूर्ण झाले, याचा मनस्वी आनंद होत असल्याचे मफीलचे उदय शेवडे यांनी सांगितले.