14 October 2019

News Flash

‘अंगकोर वाट’चा विस्मयकारी अनुभव

एखाद्या परिकथेत शोभेल अशा देशाच्या राजधानीत पनॉ पेनला आम्ही पोहोचलो

अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळच्या अंबरनाथ मंदिरावर उत्कृष्ट संशोधन करणाऱ्या विख्यात संशोधक-विदुषी डॉ. कुमुद कानिटकर यांना भेटण्याची संधी मला मिळाली. मुंबईतल्या आशियाटिक लायब्ररीत त्यांच्या याच विषयावरच्या एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी मी त्यांना भेटले होते. त्यांच्या पुस्तकावरील चर्चेदरम्यान त्यांनी मला सांगितलं की, त्यांनी कंबोडियातल्या अंगकोर वाटला भेट दिली आणि इतिहासाची अनेक आश्र्चय या प्राचीन शहरात दडलेली आढळली. त्यानंतर लगेचच आम्ही दोघांनी (मी आणि माझे पती) या विस्मयकारक ठिकाणाला स्वत: भेट देण्याचं ठरवलं. अंगकोर वाटचा समावेश तेव्हाच जगातल्या सात आश्चर्याच्या नवीन यादीत झालेला होता. लवकरच एके  सकाळी बँकॉकच्या दिशेने आम्ही निघालो. बँकॉकहून कंबोडियन एअरवेजचं विमान घेऊन आम्ही कंबोडियाच्या राजधानीत- पनॉ पेनला पोहोचलो.

एखाद्या परिकथेत शोभेल अशा देशाच्या राजधानीत पनॉ पेनला आम्ही पोहोचलो तेव्हा पहाटेची वेळ होती. हिरव्यागार भूमीवर राजवाडे, उद्यानं आणि छोटी-छोटी सुंदर घरं पसरलेली दिसली. मेकाँग आणि टोन ली सॅप या नद्यांच्या संगमावर वसलेल्या या शहरात आधुनिकतेचा आणि प्राचीनतेचा विलक्षण संगम आहे. जगभरातून (प्रामुख्याने युरोप, कोरिया आणि चीनमधून) येणाऱ्या लक्षावधी पर्यटकांमुळे शहराच्या रूपात मोठा बदल घडण्यास सुरुवात झाली आहेच. रस्ते स्वच्छ आणि नेटके आहेत. असंख्य शुभ्र फुलांनी बहरलेल्या चंपाच्या झाडांची रेलचेल बागांमध्ये आहे. देशातील सध्याचे राज्यकर्ते राजा नोरोदोम सिंहोमोनी यांचा राजवाडा शहराच्या केंद्रस्थानी आहे. राजवाडय़ाच्या सुशोभित इमारतीत अनेक मंडप, प्रेक्षागृहं आणि भेटीगाठीच्या खोल्या आहेत. पर्यटकांना केवळ सार्वजनिक खोल्यांतच प्रवेश करण्याची मुभा आहे. या खोल्यांची देखभाल उत्तम ठेवली जाते. स्वच्छ बागांमधल्या तलावांमध्ये लिली वाहत आहेत. कंबोडियातल्या धार्मिक रूढींमध्ये कमळाच्या फुलांचं स्थानही अनन्यसाधारण आहे. म्हणूनच शक्य तेवढय़ा तळ्यांमध्ये ती लावली जातात आणि सर्व प्रार्थनास्थळांजवळ विक्रीसाठी उपलब्ध असतात. अंगकोर बघणं म्हणजे एक स्वप्न पूर्ण होणं!

दुसऱ्या दिवशी एक तासभर विमानात बसून आम्ही सिएम रीपला पोहोचलो. अंगकोर स्मारकाहून सर्वात जवळचं हे शहर. आता या शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाची हॉटेल्स आहेत. सिएम रीप कंबोडियातील सर्वात मोठं सरोवर- तोन ले सॅप सिएम रीपच्या जवळ आहे. या सरोवरामुळेच कंबोडियात बाराही महिने पाण्याचा सुकाळ आहे. अंगकोर वाटला वेढलेल्या महाकाय खंदकात पाणी येतं ते सीएम रीप नदीतून. अंगकोर वाट हे आधुनिक जगातल्या सात आश्चर्यापैकी एक समजलं जातं आणि युनेस्कोनेही याचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला आहे.

अंगकोर थोम

अवघ्या काही मिनिटांत अंगकोर संकुलाशी पोहोचता येतं आणि माझ्यासारख्या नवख्या पर्यटकांसाठी सर्वोत्तम म्हणजे फ्रेंच पुरातत्त्वशास्त्रज्ञ व इतिहासकारांनी आखलेला रस्ता. एक आतील वर्तुळाकार रस्ता आणि एक बाहेरील वर्तुळाकार रस्ता. या रचनेमुळे पर्यटकांना कमीत कमी वेळात जास्तीत जास्त मंदिरं बघणं शक्य होतं. अंगकोर वास्तूंच्या उदयाबद्दलची आख्यायिका मला चकित करून गेली. या आख्यायिकेनुसार कंबोडिया हे भारत आणि चीन या दोन्ही देशांसाठी व्यापाराचं समृद्ध असं ठाणं होतं. याची परिणती म्हणून इसवीसन २००च्या सुमारास भारतीय व्यापारी इथे स्थायिक झाले. मात्र, इसवीसन सहाशेपर्यंत चेन्ला राजवट सत्तेत आलेली होती. राजा जयवर्मन यांनी या भागावर ताबा मिळवला होता. अनेक पिढय़ांनंतर जयवर्मन (सातवे) यांनी अंगकोर थोम बांधून घेतला. यात बयोन अर्थात वास्तूला सुशोभित करणारी हिंदू आणि बौद्ध शिल्पं आहेत. अंगकोरच्या सर्व वास्तूंमध्ये हिंदू संस्कृतीतील सर्वाधिक लोकप्रिय दंतकथांनी निर्मात्यांना प्रेरणा दिली असावी असं वाटतं. म्हणूनच, सर्व महत्त्वाच्या मंदिरातल्या दर्शनी भागातल्या शिल्पांमध्ये समुद्रमंथनाची प्रसिद्ध कथा आहे. यात देव आणि दानव मिळून वैश्विक समुद्र घुसळून त्यातून अमृत मिळवण्याचा प्रयत्न करतात. महाभारत आणि रामायणातल्या कथा, गंगावतरण अर्थात गंगेच्या पृथ्वीवर अवतरण्याची कथाही अनेक मंदिरात दिसते. सिएम रीपच्या पात्रामध्ये निद्रिस्तावस्थेतला विष्णू आणि असंख्य शिवलिंगांच्या माध्यमातून गंगेच्या पृथ्वीवर अवतरण्याची कथा दाखवणारी शिल्पं आहेत. अर्थात या कथेत भारतातील पवित्र नदीची- गंगेची जागा स्थानिक नदीने घेतली आहे.

अंगकोर वाट

माझा पुढचा थांबा होता तो विख्यात मंदिर अंगकोर वाट. बाराव्या शतकात सूर्यवर्मन (दुसरा) राजाने बांधलेलं हे मंदिर. हे बांधण्यास सुमारे ४० वर्ष लागली. आतापर्यंत हे कंबोडियातील सर्वात महत्त्वाचं स्थान आहे. या अप्रतिम हिंदू मंदिरात विष्णू आणि शिव या दोघांची प्रार्थना केली जाते. शिवाय हे बांधणाऱ्या राजाची समाधी इथेच आहे, असंही समजलं जातं. विविध स्तरांवर बांधण्यात आलेल्या या मंदिरात महाभारतातील युद्धाच्या तसंच रामायणातल्या रावणाविरुद्ध झालेल्या युद्धातल्या अनेक कथा उठावदार शिल्पांच्या माध्यमातून दाखवण्यात आल्या आहे. समुद्रमंथनाची कथाही उठावदार शिल्पाच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे. मंदिराच्या प्रत्येक टोकाशी एक असे चार मनोरे असून तीन स्तरांवर उभ्या असलेल्या मनोऱ्याची उंची ६५ मीटर इतकी आहे. यातला सर्वात मोठा मनोरा मध्यभागी आहे. आता याच्या शिखरावर बुद्धांची मूर्ती असून मंदिरातील विष्णूचं शिल्प म्युझियममध्ये ठेवण्यात आलं आहे.

अंगकोर वाटचं वैभव त्याच्या संकल्पनेत आहे- सूक्ष्मात सामावलेले अखिल विश्व. ही संकल्पना हिंदू तत्त्वज्ञानाचा पाया आहे. मानवनिर्मित सागरात उभं असलेलं मंदिर. या विशाल मंदिराच्या सभोवती एक खंदक आहे. मुख्य मनोरा प्रतिनिधित्व करतो मेरू पर्वताचं. हिंदू धर्मातल्या श्रद्धेनुसार हा पर्वत विश्वाच्या केंद्रस्थानी आहे. बाकीचे मनोरे म्हणजे अन्य साहाय्यक शिखरं.

बंते सामराई, प्रिआ रुप, बंते स्त्रेई, प्रिआ खान, प्रिआह नीक पीन आणि ता प्रोहम ही अन्य मंदिरंही बघण्यासारखी आहेत. यातली दोन संकल्पनेच्या दृष्टीने अनोखी आहेत. प्रिआह नीक पीन हे अत्यंत नेटकं मंदिर अनुकंपेच्या बोधीसत्वाला, अवलोकितेश्वराला वाहिलेलं आहे. यात एक चौरसाकृती तलाव असून त्याभोवती चार त्याहून लहान तलाव आहेत. मोठा तलाव हिमालयाचं प्रतिनिधित्व करतो आणि छोटे चार तलाव हिमालयातून उगम पावणाऱ्या चार नद्यांचं प्रतिनिधित्व करतात. दोन नागांचं वेटोळं असलेल्या या मंदिराचं नाव सापांवरूनच ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या शेपटय़ांचा विळखा तलावाला आहे. हे आजही तसंच्या तसं आठवतंय मला.

अंगकोर वाट किंवा प्रमुख मंदिर हा कंबोडियातला मंदिरांचा समूह आहे आणि जगातील सर्वात मोठं धार्मिक स्थळ आहे. हे ठिकाण १६२.६ हेक्टर परिसरात पसरलेलं आहे. (१६,२६,००० चौरस मीटर; ४०२ एकर). हे मुळात बांधण्यात आलं ख्मेर साम्राज्यासाठी विष्णूचं मंदिर म्हणून. हळूहळू १२व्या शतकापर्यंत याचं रूपांतर बौद्ध मंदिरात झालं. ख्मेर राजा सूर्यवर्मन (दुसरा) याने बाराव्या शतकाच्या सुरुवातीला यसोधरापुरा (सध्याचं अंगकोर) येथे हे मंदिर बांधलं. ही ख्मेर साम्राज्याची राजधानी होती. हे राजमंदिर म्हणून तसंच गरज पडल्यास समाधीस्थळ म्हणून बांधण्यात आलं. यापूर्वीच्या राजांची शिवभक्तीची परंपरा मोडून अंगकोर वाट हे विष्णूचं मंदिर बांधण्यात आलं. या स्थळावरील सर्वोत्तम रीतीने जतन करण्यात आलेलं हे मंदिर स्थापनेपासूनच महत्त्वाचं धार्मिक केंद्र राहिलं आहे. ख्मेर स्थापत्यकलेच्या अभिजात शैलीचा सर्वोत्तम आविष्कार म्हणजे हे मंदिर. आता हे कंबोडियाचं प्रतीक झालं आहे. कंबोडियाच्या राष्ट्रध्वजावर हे मंदिर आहे. कंबोडियाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हे प्रमुख आकर्षण आहे.

ख्मेर मंदिर स्थापत्यकलेचे दोन मूळ आराखडय़ांचा-  मंदिर शिखरं आणि सज्जांचं मंदिर- संयोग अंगकोर वाटमध्ये साधण्यात आला आहे. हिंदू पुराणाप्रमाणे देवांचं वसतिस्थान असलेल्या मेरूपर्वताचं प्रतीक म्हणून याची रचना करण्यात आली आहे. एका खंदकात बांधलेल्या या मंदिराची बाहेरची भिंत ३.६ किलोमीटर लांब असून तीन आयताकृती सज्जे एकावर एक आहेत. मंदिराच्या मध्यभागी मनोऱ्यांची पंचवृक्षी आहे. अंगकोरियन मंदिरं सहसा पश्चिम दिशेला नसतात पण अंगकोर वाट पश्चिमेकडे आहे. हे कशाचं प्रतीक असावं यावरून विद्वानांमध्ये अनेक मतप्रवाह आहेत. हे मंदिर नावाजलं जातं भव्यतेसाठी आणि स्थापत्यकलेतील सौहार्दासाठी, विशाल उठावदार शिल्पांसाठी आणि भिंतींना मोहक रूप देणाऱ्या असंख्य देवतांच्या शिल्पांसाठी.

अंगकोर वाटचा आधुनिक भाषेतला अर्थ आहे ‘मंदिर नगरी’ (टेम्पल सिटी) किंवा ‘मंदिरांची नगरी’ (सिटी ऑफ टेम्पल्स). नगर या संस्कृत शब्दापासून आलेल्या नोकोर या शब्दाचं हे बोलीभाषेतलं रूप आहे. मंदिरभूमी या शब्दाचा ख्मेर भाषेतील अर्थ आहे वाट. हा वट या संस्कृत शब्दापासून आलेला आहे. त्याचा अर्थ आहे आवार. हे सगळंही माझ्या स्मृतीत कोरलं गेलंय, आयुष्यभरासाठी!

विमला पाटील

भाषांतर – सायली परांजपे

sayalee.paranjape@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on December 16, 2017 5:22 am

Web Title: articles in marathi on culture of india