News Flash

कान सांभाळा..

फोन घेऊच नये, असं वाटत होतं. पण एका ज्येष्ठ नातेवाइकांचा फोन होता, टाळता येणारा नव्हता.

कान सांभाळणं हा दुहेरी शब्द आहे, जसे आपण आपले कान सांभाळले पाहिजेत तसे इतरांचेही.

मंथराने कैकयीचे कान भरले. सुमाता कुमाता ठरली. कैकयीने कान सांभाळले असते तर.. मंथरा आजही मनामनात डोकवायला उत्सुक आहे, पण आपली कैकयी होऊ द्यायची का नाही ते आपण ठरवायचं. कैकयी ती पुढची चौदा र्वष सुखाने जगू शकली असेल का? ‘कान शांत ठेवा.. मन:शांती मिळवा’ पुन्हा तेच शब्द आठवले. पण कान सांभाळणं इतकं सोपं आहे का?

‘कुठलाही ताण मनावर, शरीरावर नसणं म्हणजे ध्यान.. त्यासाठी मन शांत असायला हवं आणि मन शांत ठेवायचं असेल तर आधी कान सांभाळायला हवेत.’ स्वामीजी प्रवचनात सांगत होते.. ‘बात पते कि है..’ हे कळत होतं पण अजून स्पष्ट होत नव्हतं. पण छान वाटत होतं. स्वामीजींच्या शब्दांत, बोलण्यात ताकद आहे हे जाणवत होतं, खूप शांत वाटत होतं. श्वास ही शांत, स्थिर झाला होता. प्रवचन संपलं. बाहेर पडले.. वा! इतकं हलकं, प्रसन्न वाटत होतं, कुणाशी काही बोलू नये, या स्थितीचा फक्त अनुभव घ्यावा, असं वाटत असतानाच मोबाइलने आपलं अस्तित्व जाणवून दिलं.

फोन घेऊच नये, असं वाटत होतं. पण एका ज्येष्ठ नातेवाइकांचा फोन होता, टाळता येणारा नव्हता. पहिल्या हॅलोपासून ती व्यक्ती जरा चढलेल्या आवाजातच बोलत होती. ‘‘आमच्या अगदी घराजवळ आला होतात त्या दिवशी लग्नाला पण आमच्याकडे काही आला नाहीत..’’ हा संभाषणातला मुख्य मुद्दा. मी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मग माझी बाजू सांगायला लागले, वेळ कसा नव्हता, थोडी गडबड होती, दुसरी काही महत्त्वाची कामं कशी अचानक उद्भवली.. सगळं सांगत होते, पण तिकडून एकच धोशा.. ‘जाऊ दे आम्हाला वाटतं.. पण तुम्हाला नसेल यायचं तर नका येऊ, आमचं काही बिघडत नाही..’ वयाचा मान ठेवून आणि नात्यातलं बंधन सांभाळत सगळं ऐकून घेत होते, आतून मात्र माझीही थोडी धुसफुस होत होती, ‘आम्ही येणार हे माहीत होतं तर येण्याआधीच एक फोन करायचा. येऊन गेल्यावर आपलेपणाचा आव आणून असा जाब का विचारायचा?.. काही नाही, काही चुकलं नाही आपलं..’ मनाला समजावत होते. समोर कारणमीमांसा देण्यात काही अर्थच नव्हता. ‘पुढच्या वेळी असं नाही करणार’ असं म्हणून फोन ठेवला. आणि पुन्हा स्वत:कडे पाहिलं.. श्वास जो मगाशी शांत, स्थिर झाला होता, तो वाऱ्याच्या वेगाने दौडू लागला, हलकं हलकं जे वाटत होतं ते एकदम आवळल्यासारखं वाटू लागलं. मन जे शांत झालं होतं, ते नामदेव महाराजांच्या ओवीत म्हटल्याप्रमाणे विखुरलं गेलं. ‘बांधल्या पेंढीचा सुटलासे आळा, तृण रानोमाळा पांगतसे..’ मनाची शांतता ढळली होती. घरी आले. यांना त्या फोनबद्दल सांगितलं. ‘‘अगं, ठीक आहे, चालायचंच, मनाला एवढं लावून घेऊ नकोस.. प्रत्येक वेळेला इतकं आतपर्यंत ऐकायचं नसतं..’’ यांच्या त्या वाक्याने मी एकदम चमकून यांच्याकडे पाहिलं. ‘इतकं आतपर्यंत ऐकायचं नसतं..’ मनातल्या मनात मनापासून हसले. यांच्या स्थितप्रज्ञतेचं गमक मला उमगलं.. एरवी माझ्या बाबतीतही हेच शस्त्र हे वापरतात हे ही लक्षात आलं.. पण त्या दिवशी आनंद झाला कारण ‘कान सांभाळा, कान शांत ठेवा, मन:शांती मिळवा’ या स्वामीजींच्या वचनाचा अर्थ उलगडला.. मनाची शांती ढळवणारा राजमार्ग म्हणजे कान..

एकदम आठवली कैकयी.. मंथरेनं महालात प्रवेश काय केला नि रामकथेचं सगळं वळणच बदलून गेलं. भरतापेक्षा रामावर कणभर अधिकच प्रेम करणाऱ्या कैकयीने रामालाच वनात पाठवलं. ‘एक वराने द्या मज आंदण, भरतालागी ते सिंहासन दुज्या वराने चवदा वर्षे रामाला वनवास..’ मंथरा कैकयीच्या कानाला लागली. कान भरले. सुमाता कुमाता ठरली. हा सगळा त्या कानांचा प्रभाव. कैकयीने कान सांभाळले असते तर.. इतक्या युगांनंतर हा विचार करण्यात काय अर्थ आहे? हा विचार करण्यात अर्थ नाही पण गोष्टीचा अर्थ समजण्यात अर्थ आहे. मंथरा आजही मनामनात डोकवायला उत्सुक आहे, पण आपली कैकयी होऊ द्यायची का नाही ते आपण ठरवायचं. कैकयीला वर मागितल्यावर ‘जितं मया’ असं वाटलं असेल, पण पुढची चौदा र्वष ती सुखाने जगू शकली नसेल हे नक्की. एक क्षण काही तिला मन:शांती लाभली नसेल. ‘कान शांत ठेवा.. मन:शांती मिळवा’ पुन्हा तेच शब्द आठवले. पण कान सांभाळणं इतकं सोपं आहे का? डोळ्यांना निदान बंद करून घ्यायला झाकण तरी आहे. बरं आपले कान गजाननासारखेही नाहीत.. सुपासारखे.. ‘सारसार को ग्रही लय थोथा देई उडाय..’ गणपती म्हणजे नेता. नेत्याचे कान असे गणपतीसारखे हवेत, इतकी माणसं रोज भेटणार, बोलणार, सतत काही ना काही कानावर पडणार, पण त्यातलं सार ठेवून बाकीची फोलपटं उडवून लावण्याची कला गण-पतीला म्हणजे नेत्याला जमायला हवी. गणपतीला हत्तीचंच डोकं लावण्यातलं आपल्या संस्कृतीचं सुपीक डोकं लक्षात येतं. थोडक्यात शब्द आणि विचार पाखडून ऐकायला हवेत.. अर्थात नुसते शब्द ऐकून चालणार नाहीत, तर त्या शब्दांच्या उच्चाराच्या वेळच्या भावनेचा अबोल आवाज ही ऐकायला हवा. कारण शब्द तेच असतात, त्या क्षणी ते कुठल्या भावनेत भिजून आलेत ते ऐकणं महत्त्वाचं..

माझ्या मैत्रिणीने एकदा फार छान सांगितलं. म्हणाली, ‘‘माझी बाजू मांडताना किंवा कुणाच्या मनातला गैरसमज दूर करताना मी बोलणं पसंत करते, कधीही एसएमएस पाठवत नाही कारण एसएमएसला उच्चार आणि त्यातून येणाऱ्या भावना नसतात.  नुसते उच्चाराशिवाय पाठवलेले शब्द अशा वेळेला अधिकच गोंधळ घालू शकतात.’’ (जिज्ञासूंनी ‘आमच्या जाऊबाई म्हणजे काय ..!’ या वाक्याला वेगवेगळ्या भावनेचे स्वर लावून बघावेत) तर हा भावनेचा अस्फूट स्वर योग्य ऐकणं म्हणजे ही एका अर्थाने कान सांभाळणच की!

काय ऐकायचं आणि काय ऐकायचं नाही हे ज्याला कळलं त्याला मन:शांती मिळालीच. गौतमबुद्धांची गोष्ट नाही का.. बुद्धांना एकदा एका माणसाने येऊन भलभलत्या शिव्या दिल्या. पण त्यांच्या मुखावरची स्मितरेषा काही मिटली नाही. शिष्यांना आश्चर्य वाटलं. एका शिष्याने विचारलं, ‘‘त्याने एवढय़ा शिव्या दिल्या पण तुम्ही शांतच!’’ बुद्ध म्हणाले, ‘‘त्याने दिल्या पण मी घेतल्या नाहीत.’’ श्रवण करणं आणि ग्रहण करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. इंग्रजीत यासाठी फार सुंदर वाक्प्रचार आहे. ‘टू टर्न अ डेफ इअर’, ऐकायचं पण बहिऱ्या कानाने.

के. वि. बेलसरे यांनी आपल्या एका प्रवचनात म्हटलं होतं, ‘निन्दाव्यंजक शब्द कानावर पडू लागले की मी रामाला कानाच्या दाराशी उभं राहण्याची विनंती करतो.’ खरंच, रामचंद्र जर कानाशी उभे राहिले तर कुठलाही शब्द राममय होऊनच अंतरंगात प्रवेश करेल. ‘मरा’ शब्द सुद्धा ‘राम’ करणारे रामचंद्र दाराशी उभे राहिले तर कान हलके होण्याची भीती नाही. कबीरजी आणि तुकाराम मात्र याच्या उलट सांगतात.. ‘निंदक निकट राखिये आंगन कुटी बनाय’ स्तुती नाही ऐकलीत तरी चालेल निंदा नक्की ऐका.. अर्थात मन:शांतीच ज्यांच्या आश्रयाला गेली होती असे संत हे सहज म्हणू शकतात.. कुणी निंदा कुणी वंदा. समोरच्याने काय बोलावं हे आपल्या हातात नाही पण काय ऐकायचं ते आपल्या हातात आहे. काय ऐकायचं हा ज्याच्या त्याच्या सहनशक्तीचा विषय आहे. मनाचा तोल सांभाळणं हे कानाचं काम! फक्त मनाचाच नाही तर शरीराचा तोल सांभाळणंही कानाचंच काम आहे. आपल्या शरीराचा तोल ढळतोय याची जाणीव करून देणारी यंत्रणा निसर्गत: आपल्या कानातच असते. म्हणूनही कान सांभाळायला हवेत.

कान सांभाळणं हा दुहेरी शब्द आहे, जसे आपण आपले कान सांभाळले पाहिजेत तसे इतरांचेही. माझ्या बोलण्यातून समोरच्याचा मनाचा तोल ढळणार नाही, कुणाच्याही मनात कुणाहीबद्दलच्या गैरसमजाची बीजं पेरली जाणार नाहीत, निंदेचा धुरळा उडणार नाही, जिभेच्या कात्रीने समोरच्याचं मन कातरलं जाणार नाही, असं मला बोलता येईल? बापरे! म्हणजे समोरच्याचे कान सांभाळणं हे एका अर्थाने आपलं जिव्हाव्रत आहे.

‘ओं भद्रं कर्णेभि: श्रृणुयाम’ उपनिषदातल्या या मंत्रात ऋषींनी किती सखोल विचार केलाय.. चांगलं-वाईट, खरं-खोटं, योग्य-अयोग्य.. सगळं आपल्या अवतीभोवती आहे पण जे चांगलं भद्र आहे तेच आम्ही ऐकू.. नीरक्षीरविवेकाचं किती सुंदर उदाहरण. ‘कान सांभाळा..’ कानावर पडलेलं हे स्वामीजींचं वाक्य.. पंचाक्षरी मंत्रात बदलत चाललं होतं. नाही तरी मंत्र ही कानांनीच सांभाळायचा असतो.. सहा कानांमध्ये असलेली गोष्ट गुप्त राहत नाही. चार कानांतली गोष्ट गुप्त राहू शकते आणि दोन कानांतली गोष्ट मंत्र होते.. ती ब्रह्मदेवालाही समजत नाही..

कानांच्या या विचारात इतकी गुंतून गेले.

‘‘अगं किती हाका मारल्या, ऐकू नाही का आल्या?’’ यांनी विचारलं.

‘‘इतक्या आतपर्यंत ऐकू नाही आल्या,’’ मी सांगून टाकलं.

आता आतपर्यंत म्हणजे?.. म्हणजे आतल्या खोलीत की कानाच्या आतपर्यंत?..

धनश्री लेले dhanashreelele01@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2017 2:44 am

Web Title: dhanashree lele marathi article on ear function
Next Stories
1 क्षणस्थ
2 अलगद
3 सहज भाव
Just Now!
X