03 August 2020

News Flash

अलगद

‘पै वसंताचे रिगवणे झाडाचेनी साजेपणे’ असा माऊलींच्या ओवीचा एक चरण आहे.

स्वस्थ.. किती सुंदर शब्द! स्व स्थ ..स्वमध्ये राहणं म्हणजे स्वस्थ.. स्वत:त रमणं म्हणजे स्वस्थ.. ही  स्वस्थता यायला हवी.. भावना व्यक्त व्हायला हवी.. पण समोरच्याला ती कळलीच पाहिजे असा अट्टहास उरणार नाही.. कदाचित त्या स्वस्थतेतून आपली भावना अगदी अलगद व्यक्त करण्याची शैलीही सापडेल..

त्या दिवशी त्या विनोदी कार्यक्रमात एवढं हसण्यासारखं काय होतं हे शेवटपर्यंत कळलं नाही, म्हणजे लोक इतके मोठय़ाने का हसत होते काय माहीत? केवळ प्रेक्षकच नाहीत तर त्या दिवशी आलेले सेलेब्रिटीही. दाद देणं चांगलंच. पण इतकी ओढून ताणून? दिखाऊ दाद? कदाचित ती त्या माध्यमाची गरज असेल. आपण एकंदरीतच, सगळंच जरा अलीकडे  दिखाऊ, मोठय़ाने करतोय का? आपल्या भावना जरा अधिकच भडकपणे, प्रकटपणे मांडतोय का?

‘पै वसंताचे रिगवणे झाडाचेनी साजेपणे’ असा माऊलींच्या ओवीचा एक चरण आहे. म्हणजे साऱ्या सृष्टीचं शिशिरात हरवून गेलेलं वैभव पुन्हा दोन्ही हातांनी तिला भरभरून देणारा वसंतऋतू येतो.. कुणाच्याही नकळत! ‘मी येतोय’, ‘कोपऱ्यावर आलोय’, ‘कमिंग सून’ अशा जाहिराती करत तो येत नाही. तो येतो अगदी अलगद.. तो आलेला कळतो, झाडावर तरारलेल्या छोटय़ाशा हिरव्यागार पोपटी पालवीतून. अलगद आलेल्या मोगऱ्याच्या मंद झुळकीतून.

रवींद्रनाथ एकदा बागेमध्ये पांढरा शुभ्र झब्बा, पांढरी लुंगी, पांढरी शाल अंगावर घेऊन आरामखुर्चीत बसले होते. अचानक उठून ते आत आपल्या खोलीत गेले आणि झब्बा, लुंगी बदलून आले, म्हणजे नािरगी, केशरी रंगाचा झब्बा, लुंगी घालून आले. त्यांच्या बरोबरच्या मंडळींना कळेना की, अचानक झब्बा का बदलला? रवींद्रनाथ म्हणाले, ‘‘अरे वाऱ्याच्या झुळकीबरोबर मोगऱ्याचा वास आला. मोगऱ्याची झुळूक आली म्हणजे वसंत आला.. त्या चैतन्य आणणाऱ्या वसंताचं स्वागत त्याच्या रंगानेच करावं म्हणून केशरी झब्बा!’’ तो अलगद येणारा वसंतही धन्य आणि त्या वसंताचं आगमन तितक्याच नजाकतीने समजून घेणारे रवींद्रनाथही धन्य! रवींद्रांच्या बरोबर असणाऱ्या मंडळींनी विचारलं म्हणून त्यांनी कारण सांगितलं. ते एकटेच असते तर वसंतासारखंच त्यांनीही कुणाला कळूही न देता वसंताचं स्वागत केलं असतं. ‘रूपास भाळलो मी.. सांगू नको कुणाला’ रवींद्रांनी फक्त स्वागत नाही केलं तर त्यांनी वसंताला मनापासून दाद दिली.

दाद, वाद, रीती, प्रीती, दान, मान.. या गोष्टी अगदी अलगद व्हाव्यात, फार गाजावाजा न करता.

‘न सांगताच तू मला समजले सारे

कळतात तुलाही मौनातील इशारे

दोघांत कशाला मग शब्दांचे बांध

कळण्याचा चाले कळण्याशी संवाद’

हा न बोलता होणारा संवाद महत्त्वाचा. मोठय़ाने, जाणीवपूर्वक भावना दाखवली म्हणजेच ती समोरच्यापर्यंत पोहचतेच असं नाही. भावना ही दाखवण्याची बाबच नाही. भू-भव म्हणजे असणे.. हा भावना शब्दातला मूळ धातू. त्यामुळे ती असतेच. ती भडकपणे प्रकट करण्याची आवश्यकता नाही.

‘कौन कहेता है मुहब्बत की जुबा होती है

ये हकीकत तो निगाहोंसे बयाँ होती है’

हे फक्त प्रेमभावनेलाच नाही तर सगळ्या भावनांना लागू आहे. चारचौघांनी कौतुक केल्यावर आईच्या डोळ्यातून मिळणारी मूक दाद, किंवा एक शब्दही रागाचा न बोलता राग व्यक्त करणारे मोठय़ांचे डोळे जास्त परिणामकारक नाही वाटत? अनेकदा मंडळी तक्रार करतात, ‘‘एवढं केलं आम्ही त्यांच्यासाठी, पण साधं थँक्यू काही म्हटलं नाही.’’ थँक्यू त्यांनी तोंडी म्हटलं नसेल पण त्यांचे डोळे, त्यांचा स्पर्श कदाचित ती भावना व्यक्त करत ही असेल. किंवा ‘‘एवढं जवळचं माणूस गेलं आणि बाई बघा लगेच पुन्हा वावरायला लागली समाजात’’ ..म्हणजे तिला दु:ख होतच नाही असा त्याचा अर्थ होतो का? का तिने डोळ्यातून आसवं गाळत राहिलं तरच तिचं दु:ख खरं असतं? उलट अशी व्यक्ती अधिक विवेकी, संयमी म्हटली पाहिजे. बहिणाबाई म्हणतात तसं एक वेळ सुखाची हंडय़ा-झुंबरं छताला टांगता येतील, पण दु:खाची धग फक्त मनालाच समजू शकते ती मनातच ठेवावी.

पण एकदा शब्दांतच भावना समजून घ्यायची सवय लागली की या अलगद गोष्टी कळेनाशा होतात. खरं तर भावना जेवढी तीव्र तेवढे आपण नि:शब्द होऊ लागतो. त्या भावनेचं वर्णन नाही करता येत. तिला शब्दांत नाही पकडता येत. व्यक्त होणंही अवघड जातं. ती त्या क्षणी फक्त अनुभवता येते. तिचा अनुभवच घ्यायचा. ओशोंच्या ध्यानप्रकारात ‘जिबरीश’ नावाचं एक ध्यान आहे. त्यात आपल्या भावनेला वाट करून द्यायची असते.. पण.. फक्त अर्थहीन अक्षरातून.. शब्द नाही उच्चारायचे. वाक्य नाही म्हणायची. फक्त अक्षरं, जशी सुचतील तशी.. असं का? तर भावना शब्दांत पकडायला गेलो तर भावनेची तीव्रता कमी होते. आपलं लक्ष शब्दांकडे, वाक्याच्या जुळणीकडे जातं आणि तशीही खरी भावना शब्दांत पूर्णत्वाने व्यक्त होऊच शकत नाही. म्हणजे भावनेच्या बाबतीत शब्द तोकडे पडल्यामुळे ‘नेति नेति’च आधाराला येतं. कबीरजी म्हणतात तसं ‘पाया कहे सो बावरा, खोया कहे सो बावरा’ देव मिळाला म्हणणंही वेडेपणा आणि नाही मिळाला म्हणणं ही वेडेपणा. कारण तो शब्दात मावूच शकत नाही. भावनेचं ही तसंच आहे म्हणून ती बटबटीतपणे व्यक्त केली तर त्यातलं खरेपण हरवतं. ‘पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति’ गीतेतल्या या श्लोकात भगवंतही अप्रत्यक्षरीत्या हेच सांगतायत का? पान, फूल, फळ, किंवा साधं पाणी ही चालेल, पण जे देशील ते खऱ्या भक्तिभावाने दे. काही नाही दिलंस तरी चालेल, पण भावना खरी असू दे. दिखाऊ भावना नको. कुसुमाग्रज ‘गाभारा’ कवितेत म्हणतात तसं..

‘दर्शनाला आलात? या..

पण या देवालयात सध्या देव नाही.

गाभारा आहे, चांदीचं मखर आहे,

सोन्याच्या समया आहेत, हिऱ्यांची झालर आहे..’

देवळात सगळी चमक दमक आहे ..फक्त देव नाही.. का? देव भावाचा भुकेला.. पण तिथेही ‘रुद्राक्षांच्या गळ्यात माळां, लाविलेस तू भस्म कपाळा’ तिथेही भावनेचं प्रदर्शन.. जप किती झाला? किती माळा केल्या? सगळे हिशेब चोख..

अहमद फराज यांचा या संदर्भात एक अप्रतिम शेर आहे..

ये सोचकर मैने तो वह तस्बीह ही तोड दी फराज

उसका नाम क्या गिनकर लूँ जो बेहिसाब दे..

भगवंताची मूकपणे व्यक्त होणारी उदार भावना कळली की, आपल्या दिखाऊ , हिशेबी भावनेचं खरं रूप दिसायला लागतं. मनात येतं.. पण का? का अलीकडे सगळं दिसेल असा.. भावनेचा पट सगळ्यांसमोर मांडावासा वाटतो? सोशल मीडियावर ‘हाऊ अ‍ॅम आय फिलिंग नाऊ?’ हे सतत का सांगावंसं वाटतं? प्रत्येक भावना प्रकटपणे का बोलाविशी वाटते? समोरच्याने ही माझ्या भावनेची दखल घ्यावी ही अपेक्षा का वाढतेय? स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणारा आपला प्रवास स्थूलाकडेच का व्हायला लागलाय? या प्रश्नांची प्रत्येकाची उत्तरं वेगळी असतील ही कदाचित. सध्या माध्यमांमुळे आपला जनसंपर्क वाढलाय पण.. आत्मसंवाद मात्र कमी झालाय. माझं सुख-दु:ख, राग, लोभ.. या भावनांचा भर उतरल्यावर त्याविषयी आपणच आपल्याशी बोलायला हवं. तटस्थपणे स्वत:ला शांत करायला हवं.. पण आत्मसंवाद हरवलाय, स्वस्थता हरवलीय. स्वस्थ.. किती सुंदर शब्द! स्व स्थ ..स्वमध्ये राहणं म्हणजे स्वस्थ.. स्वत:त रमणं म्हणजे स्वस्थ.. ही स्वस्थता यायला हवी.. भावना व्यक्त व्हायला हवी.. पण समोरच्याला ती कळलीच पाहिजेत असा अट्टहास उरणार नाही.. कदाचित त्या स्वस्थतेतून आपली भावना अगदी अलगद व्यक्त करण्याची शैलीही सापडेल.. एका शायरचा एक शेर आहे, भावना किती अलगद आणि किती नजाकतीने व्यक्त करता येते याची सुंदर मिसाल आहे तो शेर..

‘उसने रात के अंधेरे मे मेरी हथेलीपर अपनी नाजूक उंगलीयोसे लिखा था मुझे प्यार है तुमसे

जाने कैसी स्याही थी वो कि लफ्ज मिटे भि नहीं और आज तक दिखे भि नहीं’

समोरच्याच्या हृदयापर्यंत पोहोचणारी भावना प्रगल्भपणे पण अलगद व्यक्त करणं सोपं नाही.. लफ्ज मिटे भी नही और दिखे भी नही..

(अर्थ – तस्बीह -जपमाळ)

dhanashreelele01@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2017 2:48 am

Web Title: healthy body language to express feelings
Next Stories
1 सहज भाव
2 पक्व
3 ‘स्व’त्व!
Just Now!
X