News Flash

मी हरले..

आमचा डाव संपला आणि ते तिघे हे.. जिंकलो.. असं आणि मी हे.. हरले.. असं आनंदानं ओरडलो..

खेळताना मी प्रत्येक डावात हरतेय हे बघून त्या छोटय़ांनी पुढच्या डावात मला जिंकू दिलं

आमचा डाव संपला आणि ते तिघे हे.. जिंकलो.. असं आणि मी हे.. हरले.. असं आनंदानं ओरडलो.. आणि क्षणात वाटलं अरेच्चा मी हरले.. किती आनंदाने ओरडले मी! लहान मुलांना आनंद मिळावा म्हणून, साधा खेळ आहे म्हणून.. हरणं किती सहज स्वत:हून स्वीकारतो आपण.. मग हे एरवी का नाही जमत आपल्याला? हरणं..

त्या दिवशी खूप दिवसांनी लहान मुलांबरोबर पत्ते खेळत होते. खूप मजा येत होती. ती तिघं आणि त्यांच्यात चौथी मी. त्यांची ‘हातां’वरून चालणारी भांडाभांडी, ‘हात’ झाल्यावर जग जिंकल्यासारखा होणारा आनंद. हे सगळं पाहताना इतकी मजा येत होती. पण गंमत म्हणजे सगळ्यात चांगली पानं मला येत होती आणि माझे भराभर ‘हात’ होत चालले होते. त्यांचे चेहरे कोमेजत चालले होते. शेवटी हातात उत्तम पानं असूनही नंतर मुद्दाम चुकीचं खेळून त्यांचे ‘हात’ होतील, असं मी खेळायला लागले आणि बघता बघता त्यांचे चेहरे उमलायला लागले आणि ते बघून क्षणाक्षणाला माझा चेहरा फुलायला लागला..

आमचा डाव संपला आणि ते तिघे हेऽऽऽ जिंकलो.. असं आणि मी हेऽऽऽ  हरले.. असं आनंदानं ओरडलो.. आणि क्षणात वाटलं, अरेच्चा मी हरले.. किती आनंदाने ओरडले मी! लहान मुलांना आनंद मिळावा म्हणून, साधा खेळ आहे म्हणून.. किती सहज हरणं स्वत:हून स्वीकारतो आपण.. मग हे एरवी का नाही जमत आपल्याला? हरणं.. या शब्दालाच नकारात्मक वलय आहे. लहानपणापासून आपल्याला जिंकणंच शिकवलं जातं.. नकळत जिंकणं हा शब्द आणि जिंकणं हा आपल्या जीवनाचा भाग बनून जातो. हरणं म्हणजे उणीव, कमीपणा असाच ग्रह आपल्या मनात तयार होतो. ‘व्हॉटस् अ‍ॅप’सारख्या माध्यमांवर घडणाऱ्या चर्चामध्येही हे किती वेळा प्रत्ययाला येतं. दोन माणसं आपापले मुद्दे त्वेषाने मांडत असतात आणि कोणीच माघार घ्यायला तयार नसतं. शेवटी ती चर्चा वैयक्तिक पातळीवर कधी घसरते हेही कळत नाही. मग कोणीतरी रागावून त्या ग्रुपवरूनच बाहेर पडतो. आपला मुद्दा, आपलं म्हणणं, आपलं मत जरूर मांडावं पण जेव्हा त्या चर्चेचं रूप बदलतंय असं जाणवायला लागतं तेव्हा त्या क्षणी थांबणं सगळ्यात उत्तम. पण हे थांबणं म्हणजे आपण हरलो असंच बहुतेकांना वाटतं आणि मग कोणीच थांबत नाही.. ‘पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना’.. प्रत्येकाला स्वत:चं मत आहे आणि ते माझ्यासारखंच असलं पाहिजे असं नाही. असं म्हणून थांबणं म्हणजे हरणं नाही किंवा ठीक आहे, मी करेन याही मुद्दय़ाचा विचार, असं म्हणून त्या चर्चेचं भांडणात रूपांतर होणार नाही हे पाहणं म्हणजे हरणं नाही. शिवाय या चर्चेतले हे दोनच मुद्दे आहेत असे आणखी अनेक मुद्दे असू शकतात. हा विचारही करायला हवा.. पण माझं तेच खरं.. मग मी थांबणं, माघार घेणं म्हणजे नामुष्की, अपयश, हार.. अशा विचाराने त्या क्षणी माघार न घेतल्याचा आनंद मिळू शकतो पण नंतर दुसरी व्यक्ती, इतर मंडळी या चर्चापासून हळूहळू दूर जातायत हे लक्षात यायला हवं. त्यातला आनंद संपायला लागेल त्या आधी थांबणं ही हार नाही आणि असली तरी काही वेळा ती स्वीकारायला हवी. अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करणाऱ्या कृष्णानेही रणातून माघार घेतली आहे. कालयवनाने आक्रमण केलं तेव्हा. कारण माघार घेण्यातच तेव्हा विवेक होता. श्रीकृष्णाने ‘रणछोड’ हे नकारात्मक नावही मोठय़ा अभिमानाने मिरवलं. कारण त्या क्षणिक हरण्यापेक्षाही माघार घेण्यात सगळ्यांचं भलं होतं आणि तोच त्याचा विजय होता. म्हणून कधी कधी हार मानण्यातही भविष्याचा, सगळ्यांचा, भावभावनांचा, आनंदाचा विचार असेल तर ती हार ही जीतच ठरते.

क्षणिक हरणं एखाद वेळी स्वीकारणं अधिक सोपं आणि अधिक योग्य ठरतं. काही जणांना तर आपल्याला कोपऱ्यात गाठून त्यांचीच मतं कशी योग्य आहेत हे पटवून देण्यात विजय वाटत असतो. त्यांना तो वाटू द्यावा, पण त्यांच्याशी उलटसुलट चर्चा करत बसून स्वत:ची शक्ती आणि मन:शांती का घालवावी? त्यापेक्षा ‘तू म्हणतोयस ना’ मग बरोबर असेल कदाचित असं म्हणून पुढे जावं.. आपलं मत प्रचंड त्वेषाने मांडलं म्हणून काहीही फरक पडत नसतो हे नंतर आपल्याच लक्षात येतं. अर्थात आपल्या मतांवर आणि निर्णयांवर अवलंबून असणाऱ्या मंडळींच्या समोर मात्र आपलं मत ठामपणे मांडावं, कारण आपल्या मतावर त्या माणसाचा निर्णय, त्याच्या आयुष्याचा काही भाग अवलंबून असतो. तिथे मात्र आपलं मत ठामपणे मांडल्याशिवाय माघार घेऊ नये.

भक्तीत आणि प्रेमात तर हरल्याशिवाय काही मिळत नाही.. ‘तुम हार के दिल अपना मेरी जीत अमर कर दो’ ही एक ओळ बरंच काही सांगून जाणारी.. काही वेळा नातं टिकवण्यासाठीही हार मानणं फार गरजेचं ठरतं. आपली बाजू असते ती बरोबरही असते. समोरच्याला ती पटवून द्यायलाच पाहिजे असंही आपलं मन उचल घेत असतं.. पण समोरचा त्या पातळीवर येऊन आपलं म्हणणं समजून घेऊ शकत नाही. शब्दाला शब्द वाढतो. खरं तर अहम्ने अहम् वाढतो आणि मग इतकं ताणलं जातं की कोणीच ताण हलका करत नाही आणि एक क्षण पुरतो. सगळं तुटायला. काही दिवस, महिने, वर्ष उलटल्यावर त्या रागाची राख झाल्यावर कळतं दोघांना की इतकं काहीच महत्त्वाचं नव्हतं ते सगळं.. पण तो एक क्षण सगळं संपवून गेला.. आपण तेव्हाच थांबायला हवं होतं.. अर्थात नात्यांच्या बाबतीतही पश्चात् बुद्धी उपयोगी पडत नाही. काचेपेक्षाही नाजूक असतात काही नाती.. अशा वेळी.. ‘‘बरं.. चुकलं.. मी समजून घेण्यात कमी पडलो/पडले.. आपण शांत होऊन नंतर कधी तरी या विषयावर बोलू या? किंवा जमलं तर विषयच सोडून देऊ या?’’ या हारसदृश वाटणाऱ्या वाक्याने भविष्यातला पश्चात्ताप टळणार तर त्या ठिकाणी ती क्षणिक हार पत्करणं हेच शहाणपण! आपली बाजू पुन्हा पुन्हा मांडण्यापेक्षा.. आणि नातंच तुटण्यापेक्षा.. त्या नात्यासाठी ‘मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेन’ असं म्हणणं हाच भविष्यातला विजय असतो.. अर्थात् असा पवित्रा दुसऱ्याने घेतला तर समोरच्यानेही एक पाऊल मागे जावं हेच उत्तम.. युद्धात युद्ध थांबवून कधी कधी ‘तह’ केला जातो. त्याला ‘संधी’ असंही म्हणतात.. खराच योग्य शब्द.. प्रत्यक्ष युद्धातही संधीला जागा असते तर चार कोपऱ्यांतल्या घरातल्या, नात्यातल्या युद्धात हार-जीत यापेक्षा ‘संधी’ असली तर.. एक संधी बऱ्याच गोष्टी मूळ पदावर आणू शकते. फक्त प्रश्न असतो तो पांढरं निशाण कुणी फडकवायचं. हा! पांढरं निशाण फडकवायला जास्त ताकद लागते. मनाची शांती लागते. नातं टिकावं ही तळमळ लागते. एक संधी देण्याचा उदारपणा असावा लागतो. अशा वेळी ‘मी हरले’.. हे आनंदाने ओरडण्यासाठी.. वेगळं बळ असावं लागतं.. शेवटी हाही एक खेळ आहे आणि तो आनंदाने खेळत खेळत पुढे जायचंय. खेळताना हार-जीतपेक्षा नंतर लक्षात राहते ती खिलाडू वृत्ती. ऑलिम्पिकमध्ये ‘सिंधू’ बॅडमिंटनच्या फायनलला हरली, पण तिच्या हरण्यापेक्षा तिनं प्रतिस्पर्धी खेळाडूची खाली पडलेली रॅकेट प्रेमानं उचलून तिच्या हाती दिली ही सिंधूची कृती आजही लक्षात राहिली. वृत्तपत्रानेही तोच क्षण टिपला. हरणं असं खिलाडू वृत्तीनं स्वीकारता आलं तर त्या क्षणाचाही आनंद सोहळा होतो. माझ्या मैत्रिणीची आई खूप छान म्हणायची, ‘‘मुलींनो तुमच्या बाहेरच्या, करिअरच्या जगात तुम्ही जिंकलं पाहिजे. तिथे सहजासहजी हार पत्करू नका, पण घरच्या, जवळच्या माणसांच्या, भावभावनांच्या बाबतीत मात्र कधीतरी हरायलाही शिका.’’ (मुलींनो, असं म्हटल्यामुळं, हे केवळ मुलींनाच का? असा प्रश्न महिला मुक्ती मंडळींना पडू शकतो. हे वाक्य मुलांना, मुलींना दोघांनाही लागू आहे. फक्त ते काकू जसं सांगायच्या त्या शब्दांत लिहिलंय इतकंच.. गैरसमज नसावा.)

अर्थात यात आपण हरतोय. जाणीवपूर्वक.. हे समोरच्याला मात्र कळू देता कामा नये.. ते हरणंही समोरच्याच्या नकळत असावं. तर त्या हरण्याचा उपयोग आहे. नाहीतर बघ हं, हे सगळं टिकवण्यासाठी मी मुद्दाम हार पत्करलीय असा अहंकाराचा वारा लागला तर नात्यांचा बंगला पडायला वेळ लागत नाही. याला ‘पडती बाजू घेणं’ असं आपण पटकन म्हणतो.. पण खरं तर ही पडती बाजू नसते तर पडझड होण्याआधी घेतलेली सावरती बाजू असते.. असो! शेवटी हार आणि जीत या व्यक्तिसापेक्ष गोष्टी आहेत. कुणी जिंकूनही हरलेलं असतं तर कुणी हरूनही जिंकलेलं असतं.. काय मिळवलं म्हणजे विजय आणि काय गमावलं म्हणजे हार हा ज्याचा त्याचा विचार!

खेळताना मी प्रत्येक डावात हरतेय हे बघून त्या छोटय़ांनी पुढच्या डावात मला जिंकू दिलं आणि ते आनंदाने उद्गारले.. ‘हे.. आम्ही हरलो..’

धनश्री लेले dhanashreelele01@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2017 1:01 am

Web Title: helping children learn to accept defeat with courage
Next Stories
1 चूकभूल
2 जरी भासते स्थिर तरी अंतरी काहूर
3 तक्रार
Just Now!
X