12 August 2020

News Flash

कष्टाला पर्याय नाही

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि माजी सी.ई.ओ. बिल गेट्स म्हणतात

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि माजी सी.ई.ओ. बिल गेट्स म्हणतात, तुम्ही जर गरीब म्हणून जन्माला आलात तर ती तुमची चूक नाही, पण गरीब म्हणूनच वारलात तर मात्र ती तुमची चूक आहे. माता-पित्यांची निवड करणे कोणाच्याच हातात नसते. म्हणून गरिबाघरी तुमचा जन्म होणं ही तुमची चूक नाही. पण त्या गरिबीतच खितपत राहून आयुष्य जगणं आणि संपविणं ही मोठी चूक आहे. ती चूक करू नका. अतिश्रीमंत होणं प्रत्येकाला शक्य नसतं. झालात तर तुमच्या केकवर चेरी मिळाल्यासारखं आहे. परंतु कष्ट, प्रामाणिकपणा, बुद्धीचा योग्य वापर आणि आत्मविश्वास या गोष्टींच्या मदतीने गरिबीवर मात करणं सहज शक्य असतं.
शेतकी महाविद्यालयामध्ये माळ्याचे काम करणाऱ्या माळीबाबांची बायको आमच्याकडे घरकामाला येत असे. गरिबीला कंटाळली होती बिचारी! मुलगा सोपाना मोठा होऊन चांगले दिवस दाखवेल या आशेवर संसाराचा गाडा ओढत होती, पण मुलाचं लक्ष अभ्यासात नव्हतं. ‘‘शिकलाच नाही तर चार पैसे कमावणार कसा? आपल्यासारखीच हलकी कामं करून, पैसा-पैसा करीत याचं आयुष्य संपणार,’’ हा विचार सतत तिचं डोकं पोखरत असे.
सोपानाला मी एकदा सहज विचारलं, ‘‘सकाळची शाळा झाली की, तू दुपारी काय करतोस?’’ प्रश्न ऐकल्याबरोबर त्याचा चेहरा आनंदाने फुलला. म्हणाला, ‘‘बाबांच्या बरोबर कॉलेजच्या बागा, मळे यात काम करतो. कॉलेजातील मुलांना शिकण्याकरता, वेगवेगळे प्रयोग करण्याकरता नवीन झाडं आणतो. कोणत्या फुलझाडाला कोणती माती, कोणते खत घातलं की फुलं भरपूर आणि चांगली येतात हे लक्षात ठेवतो.   फक्त त्यासाठी मला उन्हातान्हात मेहनत
करावी लागते.’’ तीन-चार वर्षांतच माळीबाबा सांगत आले, ‘‘सोपानाचे काम प्राचार्यानी पाहिले, ते खूष झाले. त्यांनी एक नर्सरी त्याला दिली.’’ पुढच्या दोनच वर्षांत सोपानाने स्वत:च्या तीन नर्सरीज तयार केल्या. भरपूर रोपं विकली जाऊ  लागली. प्राचार्यानी बऱ्याच कचेऱ्या, बँक, हॉटेलमध्ये त्याच्या नर्सरीमधली फुलं पाठवण्यास सुरुवात केली. भाज्या होलसेल मार्केटमध्ये विक्रीसाठी जाऊ  लागल्या. आई-वडिलांना आराम मिळू लागला. गरिबी दूर करणं कष्टप्रद आहे, अशक्य नाही.
भिक्षुकी करणाऱ्या गोविंदरावांच्या मुलाची श्रीकांतची ही गोष्ट आहे. भिक्षुकीतून मिळणारे उत्पन्न अगदीच तुटपुंजे असते. पैशांसाठी आई-बाबांची ओढाताण होते हे त्याच्या लक्षात आलं. नुसत्या पूजा करण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून व्यवसाय वाढवावा हा विचार  पक्का झाला.  त्याने हप्त्यांवर एक संगणक विकत घेतला. आधी त्याचे ज्ञान प्राप्त केले. मग जाहिराती करून बरेच तरुण ग्राहक मिळवले. अशी छान सेवा मिळते आहे हे कळल्यावर लोकांमध्ये सुद्धा त्याची चर्चा होऊ  लागली. कामं मिळू लागली, घर व्यवस्थित चालू लागलं. आई-बाबांचा चिंताग्रस्त चेहरा हसरा दिसू लागला. आता त्याने पौरोहित्याचे वर्गही सुरू केले.
तो जन्मला गरीबा घरी परंतु स्वत:लाच नव्हे तर इतरांनाही गरिबीतून बाहेर काढलं.

– गीता ग्रामोपाध्ये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2016 1:03 am

Web Title: no option to hardwork
Next Stories
1 काय करावे?
2 स्त्रीच शक्तिशाली
3 मौल्यवान हृदय
Just Now!
X