टु लिव अ क्रिएटिव लाइफ, वी मस्ट लूज द फीअर ऑफ बीइंग रॉन्ग. सर्जनशील आयुष्य जगायचे असेल तर ‘माझे काही चुकेल’ ही भीती काढून टाकली पाहिजे.

पहिल्याच प्रयत्नात क्वचितच काम यशस्वी होते. एक-दोनदा चुकल्यानंतर मात्र यश हमखास मिळते. अगदी नेहमी घडणारी गोष्ट म्हणजे आपण लहान मुलांना स्वयंपाकघरात काम करू देत नाही. खरं तर त्यांना त्याच वेळी स्वयंपाकाची आवड असते. ‘तुला येणार नाही, मधे मधे धडपडू नकोस,’ असे सांगितले जाते. त्यांनी चहा केला, चांगला झाला नाही, तर  कधीच चहा करता येणार नाही, असे सांगू नये, तर पुढच्या वेळी छान चहा करशील तू. चुकण्याची भीती वाटून घेऊ  नकोस, असे सांगायला हवे. चुका करायला वाव मिळाला तरच त्या सुधारून काही नवं  करता येईल.

रचना या हुशार मुलीला प्रवासाची खूप हौस. ओळखीपण भरपूर. आपण एक ट्रॅव्हल कंपनी काढावी ही तिची तीव्र इच्छा, पण ट्रिपमध्ये तोटा होईल ही भीती वाटायची. ती दहा जणांचा ग्रुप घेऊन दोन दिवसांच्या टूरवर गेली. सगळे ओळखीचे होते, त्यामुळे होणारी गैरसोय, त्रास पुढील वेळेस कसे टाळता येतील हे ठरवता आले. चुका होणार या भीतीने ती या वेळी गप्प बसली नाही. पुढची ट्रिप चार दिवसांची नेली. आता प्रवास सुखाचा झाला. ट्रेन, बसचे बुकिंग छान झाले होते. जेवणाच्या बाबतीत प्रवासी थोडे नाराज होते. ही चूक सुधारण्याकरिता चांगली हॉटेल्स शोधली. पर्यटनस्थळांची इत्थंभूत माहिती प्रवाशांना हवी असते हे जाणून तेथील अभ्यास करून ती जाऊ  लागली. टूरची गुणवत्ता वाढली. थोडे जास्त पैसे लोक आनंदाने देऊ  लागले. रचनाचा नफा, उत्साह वाढला. चांगला कर्मचारी वर्ग तयार झाला. टूर्सवर माझे काही चुकेल, सगळे मुसळ केरात जाईल ही भीती तिने बाळगली नाही, म्हणूनच ‘छोटय़ा टूर्स छान अरेंज करणारी कंपनी’ अशी तिच्या कंपनीची ख्याती झाली.

आय.टी.आय.मधून डिप्लोमा घेतलेला शरद गरिबीतच वाढलेला, पण आयुष्य तसेच काढायचे नाही, हा ठाम निश्चय होता त्याचा. सुतारकामाची त्याला आवड होती. छोटेसे कंत्राट घ्यावे, कामाला सुरुवात करावी, असा विचार त्याने केला. काही चूक झाली काम बिघडले तर नुकसानभरपाई देण्याइतके पैसे कोठून आणायचे? हा विचार डोके पोखरू लागला. वडिलांनी धीर दिला. ‘‘तू काम शिकला आहेस तेव्हा मोठी चूक तू करणार नाहीस, लहानसहान चुका होणारच. तेवढय़ाकरिता घाबरून कामच न करण्याची चूक करू नकोस, चुका सुधारण्याकरिता तर काम करायचे असते.’’ त्यांच्याच एका मित्राने छोटेसे घर घेतले होते.

एक कपाट, सेफ्टी डोअर हे शरदने करावे, असे त्यांनी सुचविले. भीत भीत मदतनीसाशिवाय कामाला सुरुवात झाली. थोडा वेळ जास्त लागला, सामान जास्त आणले गेले. सामान पुढच्या कामात उपयोगी पडणार होते, पण चुकांची भीती मनातून गेली. बरोबर शिकलेल्या एखाद्या मित्राला मदतनीसाचे काम देऊन आता तो बरीच कामे करतो आहे.

 

गीता ग्रामोपाध्ये

geetagramopadhye@yahoo.com