तुम्हाला काय हवे असते? खरे तर फार काही नको असते. अशा फारच थोडय़ा गोष्टी असतात ज्याची आसक्ती असते, ज्याची तीव्र इच्छा असते. ज्याबद्दल तुमचा आग्रह असतो आणि ज्या गोष्टींचा नकार तुम्ही पचवू शकत नाही. त्यातील काही गोष्टी म्हणजे, उत्तम आरोग्य आणि आयुष्याबद्दल आसक्ती, अन्न, झोप, पैसे व पैशामुळे घेता येणाऱ्या गोष्टी, संतुष्ट करणारा संभोग, मुलांचे उत्तम भवितव्य आणि आपण किती महत्त्वाचे आहोत ही भावना.
सहसा यांपैकी सगळ्या मागण्या पूर्ण होतात. फक्त एक सोडून, आपली एक तीव्र आंतरिक इच्छा असते; अत्यंत खोलवरची, अत्यंत निकडीची. अगदी अन्न आणि झोप यांच्याइतकी आवश्यक, पण ती क्वचितच पूर्ण होते. फ्रॉइड या इच्छेला म्हणतो, ‘आपण कोणी तरी महत्त्वाचे आहोत या भावनेची जाणीव.’
लिंकनने एकदा एक पत्र लिहिले, ज्याची सुरुवात होती, ‘प्रत्येकाला स्तुती आवडते.’ विल्यम जेम्स म्हणतो, ‘मनुष्य-स्वभावाचे ठळक वैशिष्टय़ कोणते, तर कौतुकाची भूक.’ विल्यम जेम्सने इच्छा, आकांक्षा वगैरे शब्द वापरले नाहीत, तर तो ‘कौतुकाची भूक’ म्हणतो. मानवी स्वभावाची ही एक मनाला कुरतडणारी आणि अव्याहत अशी भूक आहे. जी व्यक्ती प्रामाणिकपणे अशी भूक भागवते, त्या व्यक्तीला इतर लोकही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात आणि अशा व्यक्तींचा मृत्यू झाला, तर स्मशानातील अंत्यसंस्कार करणारा माणूससुद्धा हळहळतो.
आपल्याला मोठेपणा मिळावा यासाठी तीव्र इच्छा मनी बाळगणे, हाच तर मानव आणि प्राणी यांच्यातील सर्वात मोठा फरक आहे. जेव्हा मी मिसुरीमधील एका शेतकऱ्याचा लहान मुलगा होतो तेव्हा माझ्या वडिलांनी डय़ुरोक जर्सी जातीची सुंदर डुकरे पाळली होती. त्याचबरोबर उच्च जातीची पांढऱ्या तोंडाची काही गुरे आठवडय़ाच्या बाजारातून मध्य- पश्चिमी देशातून आणली होती. आम्हाला जनावरांच्या प्रदर्शनात पहिले बक्षीस मिळाले होते. बक्षिसाचे मानचिन्ह म्हणून मिळालेल्या निळ्या रिबिनी एका पांढऱ्या मखमली कापडावर माझ्या वडिलांनी पिनांनी लावून ठेवल्या होत्या आणि जेव्हा जेव्हा कोणी मित्रमंडळी किंवा पाहुणे घरी येत तेव्हा ते पांढरे मलमली कापड बाहेर काढत. त्या कापडाचेच एक टोक ते हातात धरत व दुसरे टोक मला पकडायला लावत आणि त्या रिबिनी कौतुकाने दाखवत. आमच्या गुराढोरांना याचा काहीच पत्ता नसे की, त्यांनी या रिबिनी जिंकून आणलेल्या आहेत, पण माझ्या वडिलांना मात्र त्याचा अभिमान होता. या बक्षिसांमुळे आपण कोणी तरी महान आहोत असे त्यांना वाटे.
जर आपल्या पूर्वजांना अशी महत्त्वपूर्ण वाटण्याची तीव्र इच्छा नसती, तर आपला समाज आज इतका प्रगत झाला नसता. तो पूर्वीचाच रानटी, आदिमानव काळातला राहिला असता. आपण इतरांपेक्षा काही तरी वेगळे आहोत, मोठे आहोत या जाणिवेशिवाय आपले जीवन प्राण्यांसारखे झाले असते. महत्त्वपूर्ण असण्याच्या याच तीव्र इच्छेनेच एका किराणा दुकानातील अशिक्षित, गरिबीने गांजलेल्या कारकुनाला वकिलीच्या पुस्तकांचा अभ्यास करण्यास भाग पाडले. ही पुस्तके एका पिंपाच्या तळाशी रद्दीत पडलेली होती. ती त्या कारकुनाने पन्नास सेंट्सला विकत घेतली. कदाचित त्या कारकुनाचे नाव तुम्ही ऐकले असेल. त्याचे नाव होते अब्राहम लिंकन!
आपणही इतरांपेक्षा वेगळे असावे या भावनेचा जन्म झाल्यामुळेच डिकेन्सने इतक्या अमर कादंबऱ्या लिहिल्या. याच आंतरिक इच्छेमुळे सर ख्रिस्तोफोर रेन याने दगडांमध्ये त्याचे संगीत कोरले. याच आंतरिक इच्छेने रॉक फेलरला कोटय़वधी रुपये गरिबांसाठी खर्च करण्यास उद्युक्त केले, जे पूर्वी त्याने कधीही केले नव्हते!
(‘मेहता पब्लिशिंग हाऊस’च्या ‘मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा’ या डेल कार्नेजी यांच्या -अनुवाद- अॅड. शुभदा विद्वांस पुस्तकातून)
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jan 2016 रोजी प्रकाशित
कौतुकाची भूक
आपल्याला मोठेपणा मिळावा यासाठी तीव्र इच्छा मनी बाळगणे
Written by लोकसत्ता टीम
First published on: 02-01-2016 at 01:27 IST
मराठीतील सर्व मन वढाय वढाय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What humans want in life