21 October 2018

News Flash

प्रतीक्षा

एखाद्यासोबत राहणं, हे त्याच्याशिवाय राहण्याइतकंच वेदनादायी असेल तर?

एखाद्यासोबत राहणं, हे त्याच्याशिवाय राहण्याइतकंच वेदनादायी असेल तर? .. जेमतेम तिशी गाठलेली प्रतीक्षा माझ्यासमोर येऊन बसते तेव्हा दरवेळी तिच्या फसलेल्या लग्नाची कहाणी मला अस्वस्थ करते; ती मात्र शांत असते. ती तिची शांती कडवट असते, पण त्यात दु:ख, अपयशातून येणारी उदासी असते की नाही याबद्दल मी पहिल्यापासूनच साशंक आहे.

मी वैवाहिक समुपदेशक नाही, पण अनुभवानं एवढं जाणतो की, ताणतणाव असलेल्या जोडप्यात एक जुळवून घेण्याची, तो/ती मुळात चांगली असल्याची सजग जाणीव असल्याशिवाय ते समुपदेशन यशस्वी होणं कठीण. ‘जुळवून घ्यायचं आहे, घेण्यायोग्यही आहे, पण कसं जुळवायचं समजत नाही’ अशा स्वरूपाची विचारसरणी असलेली जोडपी असतील तरच समुपदेशन सफल होईल. प्रतीक्षा एक डॉक्टर आहे. महाविद्यालयात नोकरी करते. तिचा नवराही डॉक्टरच आहे, मात्र तो खासगी व्यवसाय करतो. लग्नाला पाच वर्षे झालीत, तिला दोन वर्षांची एक मुलगीही आहे. लग्नाच्या पहिल्या दिवशीच आपलं रसायन विद्राव्य नाही हे दोघांच्याही लक्षात आलं. त्याच्या असंख्य मावशा-आत्यांच्या पाया पडून ती कंटाळली आणि चेहऱ्यावरची नाराजीची छटा तिने लपविण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. जिच्या पाया ती पडली नाही ती त्याची सगळ्यात ‘प्रेस्टिजस’ आत्या होती! आत्याला विशेष काही वाटलं नाही. तोच दुखावला, कारण त्याचा अहंभाव दुखावला (हा अहंभाव फार भाव खाणारी गोष्ट आहे. ज्यांच्याजवळ ती असते ती थोडय़ा थोडय़ा गोष्टीने दुखावण्यासाठीच असते.) आपल्या सासरचे लोक ‘कर्मठ’ आहेत असा तिने ग्रह करून घेतला आणि आपले संरक्षक अस्त्र पाजळले- आक्रमक असहकार! लहानपणीही, एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली की, ती ओठ आवळून, हात बांधून कासवासारखी घट्ट बसायची. आईने तिची खूप मनधरणी केल्यावरच तिचा असहकाराचा विळखा सुटायचा. सासरी कुणी मनधरणी करण्याचा प्रश्नच नव्हता. तो कुणी कालांतराने केलाही असता, जर तसा मातृभाव तिने कधी कुणात जागवला असता तर. म्हणतात ना, मुलाला जन्म देते ती आई, आईपण जन्माला घालते ते मूल. मात्र सासरी गेल्यावर तिने नवा जन्म घेतला नाही, अन् कुणाच्या मातृभावाला जन्म दिला नाही. सासरी ती पूर्वजन्म आणि पूर्वग्रहच घेऊन आली होती, तिथे कुणाचं आईपण जागं होणार?

सुरुवातीचे शारीर जवळीकीचे सोपस्कार आटोपले, अन् दोन पूर्वग्रहांचा संसार सुरू झाला. खरे तर या जवळीकीतून प्रेमाचं एक अस्तर विणायला सुरुवात व्हायला हवी. ते नसेल तर जवळीक फक्त शारीर उरते आणि कालांतराने अस्तराशिवाय कपडा फाटून जावा तसे ती ओढही विरून जाते. लहानसहान गोष्टींवरून खटके उडायला लागतात. ‘तुम्ही बेडवर ओले टॉवेल का टाकून ठेवता?’, किंवा ‘आई आजारी आहे माहीत असून तिची फोनवर साधी विचारपूस केली नाहीस?’ हे खटके ओला टावेल किंवा फोनपुरते मर्यादित नसतात, नात्याच्या मुळांना दुराव्याची कीड लागल्याची ती लक्षणे असतात.

पुढली तीन वर्षे दोघांचा प्रवास खाचखळग्यांतून झाला. त्यात सासू-सासरा-दीर म्हणजे दोघांच्या नाटकात रंगमंचावर चढून भाग घेणारे प्रेक्षक ! ही आढय़ताखोर आहे, चढेल आहे, आपल्या घराविषयी हिला प्रेम नाही, ही नवरा पार्टीची झालेली घट्ट समजूत, आणि आपलं सासर जुनाट मतांचं आहे आणि नवरा त्यांचीच री ओढून बायकोला महत्त्व देत नाही हे प्रतीक्षाचं मत. एकदा मत तयार केलं की मग प्रत्येक क्षुल्लक, वरवर निरुपद्रवी प्रसंगांना आपल्या पूर्वग्रहांच्या रंगात रंगवून ते अधिक घट्ट करणं ही अपरिहार्य, सहजतेने घडणारी क्रिया. मानसिक दुरावा वाढला तशी प्रतीक्षाने दोन वर्षांच्या मुलीला घेऊन माहेरगावी बदली करून घेतली. माझ्यासमोर एकटीच बसली होती. ‘ते यायला तयार नाहीत, माझं काही चुकलं नाही, तुला गरज असेल तर तू जा,’ हे बोलणं म्हणजे नातेसंबंधातील दुराव्याचं गंभीर लक्षण.

‘‘हे बघ,’’ तिच्या नवऱ्याविषयीच्या तक्रारींची जंत्री ऐकून घेतल्यावर मी म्हटलं, ‘‘तुझंच सगळं चुकतं आहे असं नाही, पण हे नातेसंबंध टिकवण्यासाठी एक प्रयोग करू या. कुठलाच वाद निर्माण होऊ द्यायचा नाही, तसा प्रसंग आलाच तर उलट उत्तरं टाळायची. त्यांचं चुकतं आहे, असं वाटलं तरी त्या क्षणी ऐकून घ्यायचं. कोऱ्या पाटीनं संसाराच्या या शाळेत प्रवेश घ्यायचा. तुमच्या दोघांत फार मोठे वाद आहेत असे मला वाटत नाही. तू इथे निघून आल्यापासून तुझे सासरे दोनदा येऊन गेले, तुझा नवरा मुलीला रोज आवर्जून फोन करतो या सकारात्मक गोष्टी आहेत.’’

‘‘म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्यांचं चुकत असलं तरी मीच ऐकून घ्यायचं?’’ प्रतीक्षाच्या आक्रमक असहकाराने फणा काढला. ‘‘हे बघ, जशास तसे हा व्यूह शत्रूसोबत वागताना ठीक पण स्वकीयांबाबत नाही! उत्तराला उत्तर देण्यानं तात्कालिक समाधान मिळेल, पण दीर्घकालीन संबंधासाठी ते ठीक नाही. आपल्याला आयुष्याची एक मोठी, आनंदाची खेळी खेळायची तर सुरुवातीचे काही चेंडू नुसते सोडून द्यावे लागतील, काही शांतपणे खेळून काढावे लागतील!’’ सचिनची चाहती असलेल्या प्रतीक्षाला मी क्रिकेटची उपमा दिल्याने ती थोडी विचारात पडली. पण काहीच दिवसांत परतली तो जुनाच पवित्रा घेऊन. ‘‘नाही सर, तो बदलायला तयार नाही. त्याच भाषेत बोलतो. इच्छा असली तर ये म्हणतो. मग आमची भांडणं होतात. थोडक्यात माझं तुझ्याशिवाय अडत नाही असाच त्याचा सूर असतो.’’ हा सूर प्रतीक्षाने आपल्याच पूर्वग्रहात भिजवून काढला आहे हे मी ओळखलं. हे पूर्वग्रह प्रतीक्षासारख्या असंख्य जोडप्यांना सुसंवादापासून वंचित ठेवतात.

जोडप्यातला प्रत्येक संवाद गोड गोड असावा असं नाही, ते कुठे घडतही नाही. भांडणं होतात, व्हावीही. कारण भांडणं एकमेकांना जोडणारा एक सेतूच असतो! भांडणातही एक प्रकारचा संवाद असतो. मात्र शेवटाला येता येता ती निवळावी. अशी भांडणं म्हणजे घरातला केरकचरा काढण्यासारखं. तो रोज काढावा लागतो. एका पिशवीत भरून बाहेर टाकावा लागतो. रोजच्या रोज केर काढलेलं घर स्वच्छ राहातं! मने स्वच्छ राहतात.

आता मी तिच्यासमोर या प्रश्नाकडे एक वेगळ्या अँगलने बघण्याचा कॅमेरा लावला. ‘‘समजा तू एक समुपदेशक आहेस आणि तुझ्यासारखी समस्या घेऊन एक मुलगी तुझ्याकडे आली, तर तू तिला काय सांगशील?’’ एका अर्थाने स्वत:कडे अलिप्तपणे पाहण्याचा हा सराव होता. समस्याग्रस्त माणूस हा प्रवाहात असतो. तो जोवर त्याच्यापासून वेगळा होत नाही, किनारा गाठून क्षणभर दम घेत नाही, तोवर त्याला समस्येचा आवाका लक्षात येत नाही.

‘‘मी काय सांगणार तिला?’’ बोलता बोलता प्रतीक्षा केविलवाणे हसू लागली. तिच्या त्या हसण्यानेही मला थोडा हुरूप आला. हाच मुद्दा रेटून मी तिला प्रयत्न करायचा सल्ला देऊन पाठवलं, अन् विचार करू लागलो, स्वत:विषयी, स्वत:च्या अस्तित्वाविषयी विचार करूशकणारा एकमेव प्राणी म्हणजे माणूस.

वयाच्या तिसऱ्या वर्षीच मी आणि हे जग वेगळं आहे ही जाणीव माणसाला येते. मात्र या जगण्यापासून ‘मी’ला वेगळं करण्याची सुप्त शक्ती माणसं वापरत नाहीत. माणसं अनुभवातून शिकत नाहीत यापेक्षा जास्त दु:खं, माणसं अनुभवापासून वेगळी होत नाहीत हे आहे. ही अलिप्तपणे स्वत:कडे पाहण्याची वृत्ती नुसत्या शिक्षणाने येत नाही. साऱ्या समस्याचं मूळ तेच आहे. ती सुप्त शक्ती अंगी येण्यासाठी किती काळ ‘प्रतीक्षा’ करावी लागेल कोण जाणे!

डॉ. नंदू मुलमुले

nandu1957@yahoo.co.in

 

First Published on October 28, 2017 2:09 am

Web Title: dr nandu mulmule article about love part 2