आपण जणू चित्रपटाच्या चित्रीकरणासाठीच आलो आहोत, अशा आविर्भावात ‘दबंग’ सलमान खान शुक्रवारी ‘अगदी वेळेत’ सत्र न्यायालयात हजर झाला. मात्र तू आरोपी आहेस आणि मागे आरोपीच्या पिंजऱ्यात जाऊन बस, असे न्यायालयाने बजावताच सलमानचा भ्रमाचा भोपळा फुटला. अर्थात तरीही आरोपीच्या पिंजऱ्यातील पुढील दीड तास सलमानने डुलक्या काढण्यात घालविला.
सदोष मनुष्यवधाचा नवा आरोप ठेवण्यात आल्यानंतर सत्र न्यायालयातील सुनावणीकरिता सलमान पहिल्यांदाच हजर झाला. मोरपिशी रंगाचा शर्ट आणि जीन्स अशा पेहरावात सलमान आपल्या बहिणी अलविरा, अर्पिता आणि अंगरक्षक शेरा यांच्यासोबत सकाळी पावणेअकराच्या सुमारास न्यायालयात हजर झाला. पोलीस बंदोबस्तामुळे केवळ वकील, न्यायालयीन कर्मचारी वर्ग आणि प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधी एवढय़ांनाच न्यायालयात प्रवेश देण्यात येत होते.
सव्वाबाराच्या सुमारास त्याच्या खटल्याचे कामकाज सुरू होताच न्यायाधीशांनी ‘आरोपी कुठे आहे, आला आहे का’ अशी विचारणा करताच सलमान खडबडून उभा राहिला. तो दोन पावले पुढे सरकणार तोच न्यायाधीशांनी त्याला ‘पुढे नको येऊ, मागे आरोपीच्या पिंजऱ्यात जाऊन बस’, असे बजावले आणि सलमानही अगदी आपल्या ‘दबंग स्टाइल’मध्ये सांगितल्या दिशेने गेला. त्याने स्वत:च आरोपीच्या पिंजऱ्याचे दार उघडले आणि आत जाऊन उभा राहिला. दुपारी पावणेदोनपर्यंत सुनावणी सुरू होती. वकील काय बोलत आहेत, न्यायाधीश काय विचारत आहेत याचा जराही विचार न करता सलमानने आरोपीच्या पिंजऱ्यातील दीड-दोन तास अक्षरश: डुलक्या काढण्यात आणि फोनवर खेळण्यात घालविले. अखेर दीड तासानंतर सुनावणी संपल्याचे जाहीर होताच सलमान आरोपीच्या पिंजऱ्यातून बाहेर पडला.
सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्याबाबत सरकारी वकील आणि सलमानच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला. सलमानने मद्यपान केल्याने काय परिणाम होऊ शकतात हे माहीत असतानाही कृत्य केले. त्यामुळे त्याच्यावर या आरोपाअंतर्गत खटला चालविण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. तर नव्या आरोपानुसार खटला चालविण्यात येऊ नये ही सलमानची फेरविचार विनंती न्यायालयाने फेटाळून लावली असली, तरी पुढे आलेल्या पुराव्यांनुसार त्याच्यावर या आरोपांनुसार खटला चालवला जाऊ शकत नसल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलांकडून करण्यात आला. न्यायालयाने २४ जुलै रोजी प्रकरणाची सुनावणी ठेवली आहे. न्यायालयाने त्याला त्या दिवशी न चुकता हजर राहण्याचे आदेश दिले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jul 2013 रोजी प्रकाशित
सलमानच्या ‘पिंजऱ्यात’ डुलक्या!
आपण जणू चित्रपटाच्या चित्रीकरणासाठीच आलो आहोत, अशा आविर्भावात ‘दबंग’ सलमान खान शुक्रवारी ‘अगदी वेळेत’ सत्र न्यायालयात हजर झाला.

First published on: 20-07-2013 at 01:58 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salmans venetian blinds in front of sesian court judge