अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांचा बहुप्रतिक्षित ‘१०२ नॉट आऊट’ सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमातून अमिताभ आणि ऋषी यांची जोडी २७ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. सिनेमाचा टीझर पाहून या सिनेमाबद्दलची उत्सुकता नक्कीच वाढते यात काही शंका नाही. बॉलिवूडमधील दोन तगडे कलाकार जेव्हा एकत्र येतात तेव्हा समोर येणारी कलाकृतीही काही वेगळीच असते. ‘१०२ नॉट आऊट’ या सिनेमाचा टीझर पाहून ही गोष्ट पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवायला लागते. ‘अमर अकबर अँथनी’ सिनेमात बिग बी आणि ऋषी यांनी सख्ख्या भावांची व्यक्तिरेखा साकारली होती. या सिनेमात अमिताभ ऋषी यांचे वडील दाखवण्यात आले आहेत.

‘१०२ नॉट आऊट’ ही अशा बाप-लेकांची गोष्ट आहे ज्यात वडिलांचे वय १०२ असते. पण १०२ वयाचे वडील अंथरुणाला खिळून राहिलेले न दाखवता अजूनही आयुष्याचा मनमुराद आनंद घेताना दिसतात. त्याउलट त्यांचा मुलगा हा आयुष्याकडे नकारात्मक पद्धतीने पाहत असतो. एकीकडे १०२ वर्षांचे बाबा सेक्सोफोन वाजवताना फुटबॉल खेळताना दिसतात तर ७५ वर्षांचा मुलगा घरात चिंतेने येरझाऱ्या मारताना, योगासनं करताना दिसतो. लेखकाने या सिनेमात बाप-लेकांमधील पिढीतले अंतर एका वेगळ्या पद्धतीने दाखवले आहे.

‘ओह माय गॉड’ सिनेमाचा दिग्दर्शक उमेश शुक्लाने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. यावर्षी ४ मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. टीझरमध्ये या दोघांचे व्यक्तिमत्व ठळकपणमे दाखवण्यात आले आहे. टीझरमध्ये अमिताभ यांच्या तोंडी फक्त एकच संवाद आहे ते म्हणतात की, ‘मी जगातला पहिला बाप असेन जो स्वतः आपल्या मुलाला वृद्धाश्रमात घालणार आहे.’