दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार यांची मुख्य भूमिका असलेला ‘2.0’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘2.0’ हा चित्रपट भारतातील सर्वांत महागडा आणि आशिया खंडातील सर्वाधिक बजेटचा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटातील व्हीएफएक्सवर तब्बल ५५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. थलैवाचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक असून पहिल्या शोपासूनच चित्रपटगृहांबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे.

या चित्रपटासाठी जगभरातील ३००० हून अधिक तंत्रज्ञांनी काम केलं असून त्यापैकी १००० व्हीएफएक्स कलाकार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरने युट्यूबवरील विक्रम मोडले असून आता बॉक्स ऑफीसवरील विक्रमसुद्धा मोडण्यास सज्ज झाला आहे. अवघ्या २४ तासांत डिजीटल प्लॅटफॉर्मवर या ट्रेलरला तब्बल २ कोटी ५० लाख व्ह्यूज मिळाले होते. या ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद पाहता चित्रपटाची बॉक्स ऑफीस कमाईसुद्धा धमाकेदार होईल असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. ‘2.0’ प्रदर्शनाच्या दिवशी २० ते २५ कोटींचा गल्ला जमवेल अशी शक्यता चित्रपट व्यापार विश्लेषक गिरीश जोहर यांनी व्यक्त केली आहे. हा आकडा त्यांनी फक्त हिंदी चित्रपटासाठी सांगितला आहे. तमिळ आणि तेलुगू भाषेतील कमाईचा विचार केल्यास हा आकडा जवळपास १०० कोटींपर्यंत जाऊ शकतो, असंही ते म्हणाले.

‘तंत्रज्ञान आणि कथा यांचा उत्तम मेळ ‘ 2.0′ मध्ये घालण्यात आला आहे. केवळ मनोरंजन एवढाच उद्देश या चित्रपटाचा नसून यात सामाजिक संदेशही दडला आहे. म्हणूनच हा चित्रपट यशस्वी होईल असा मला विश्वास वाटतो. हा चित्रपट नक्कीच सिनेसृष्टीचा अभिमान आहे’ असं म्हणत रजनीकांत यांनी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आपलं मनोगत व्यक्त केलं होतं.