प्रदर्शन तारखेच्या ६८ दिवस आधी चित्रपट प्रमाणित करण्यासाठी पाठवायचा असे सांगत सेन्सॉर बोर्डाने ‘पद्मावती’ हा चित्रपट निर्मात्यांकडे परत पाठवला. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी पुढे ढकलली. दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, हाच ६८ दिवसांच नियम ‘फुकरे रिटर्न्स’च्या बाबतीत पाळला नसल्याचे समोर येत आहे.

२०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फुकरे’ या चित्रपटाचा हा सिक्वल आहे. ज्याला प्रदर्शनाच्या फक्त १२ दिवस आधी सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र देण्यात आले. पुलकित सम्राटची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट ८ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

वाचा : कास्टिंग काऊचबद्दल सलमान म्हणतो..

‘पद्मावती’च्या निर्मात्यांनी प्रमाणपत्राचे अर्ज नीट भरले नसल्याचे कारण सेन्सॉर बोर्डाकडून दिले गेले. याशिवाय ६८ दिवसांचा नियम इतर चित्रपटांच्या बाबतीत तितक्याच काटेकोरपणे पाळले नसल्याचे समोर येत आहे. सेन्सॉर बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुराग श्रीवास्तव यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले होते की, ‘६८ दिवसांचा नियम यापूर्वीही होता. बऱ्याचदा लोक प्रदर्शनाची तारीख जवळ आली असता बोर्डाकडे चित्रपट पाठवतात. यासाठीच हा नियम आम्ही लोकांना पुन्हा एकदा लक्षात आणून दिला आहे.’

वाचा : ‘ये है मोहब्बते’मधून दिव्यांकाची एक्झिट?

सध्या तरी ६८ दिवसांच्या आपल्या नियमावर ठाम राहण्याचा निर्धार सेन्सॉर बोर्डाकडून व्यक्त झाला असल्याने त्याचे पालन करण्याशिवाय ‘पद्मावती’च्या निर्माता-दिग्दर्शकांकडे अन्य पर्याय उरलेला नाही.