चाहत्यांना जवळजवळ दोन दशके वाट पहायला लावल्यानंतर आता ‘रेहना है तेरे दिल मै’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सिक्वेल आणण्याची तयारी सुरु केली आहे. २००१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपाटाला सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र नंतर हा चित्रपट गाणी, संगीत आणि चित्रपटातील प्रमुख पात्रांच्या भूमिकेमुळे चांगलाच चर्चेत आला. आजही या चित्रपटातील गाणी आवर्जून ऐकली जातात. या चित्रपटाचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. याच चित्रपटामुळे दक्षिणेत प्रसिद्ध असणाऱ्या आर. माधवन आणि दिया मिर्झाला नवीन ओळख मिळाली. आता या चित्रपटाच्या सिक्वेलवर काम सुरु असल्याचे वृत्त मिड डेनं दिलं आहे.

मागील अनेक वर्षांपासून या चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा सुरु होती. मात्र आता या सिक्वेलसाठीची तयारी सुरु करण्यात आल्याचे समजते. निर्मात्यांनी चित्रपटाच्या स्क्रीप्टवर काम करुन त्याला अंतिम स्वरुप दिलं आहे. तसेच आर. माधवन आणि दिया यांच्याशीही निर्मात्यांची चर्चा सुरु आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चाहत्यांना माधवन मॅडीच्या तर दिया रिनाच्या भूमिकेत दिसणार आहे.

“मागील अनेक वर्षांपासून चित्रपटाचे निर्माते वेगवेगळ्या गोष्टींवरुन सिक्वेलबद्दल विचार विनियम करत होते. नुकतीच सर्वांच्या पसंतीने एक कथा निवडण्यात आली आहे. सर्वांना स्क्रीप्ट आवडले आहे. यामध्ये मॅडी आणि रिनाच्या आयुष्यात लग्नानंतर काय होतं यासंदर्भातील कथा पहायला मिळेल. मात्र स्क्रीप्टसंदर्भातील काही बदल करुन अंतीम टप्प्यातील काम सुरु आहे,” असं या चित्रपटाशी संबंधित एका व्यक्तीने ‘मिड डे’शी बोलताना सांगितलं आहे.

लग्नानंतर मॅडी आणि रिनाच्या प्रेम कथेमध्ये कसा बदल होतो आणि संसार सुरु झाल्यानंतर प्रेमसंदर्भात त्यांचा भ्रमनिरास कसा होतो अशा वळणाने ही कथा जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दोघांमध्ये निर्माण झालेले वाद सोडवण्यासाठी हे दोघे कसा प्रयत्न करतात यासंदर्भातील ही कथा आहे. मागील महिन्यामध्ये एका लाइव्ह चॅटदरम्यान दियाने या चित्रपटाच्या सिक्वेलचे स्पष्टपणे संकेत दिले होते.

“आम्ही यासंदर्भात एकत्र येऊन काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र आम्ही यावेळीही आमची सर्वोत्तम कला सादर करण्यासाठी अधिक प्रयत्न करत आहोत. माधव आणि रिनाची कथा खास आहे. ते दोघेही खूप साधे, खरे आणि प्रेमळ आहेत. आजही अनेकांना हा चित्रपट जवळचा वाटतो. या भावनेला कुठेही ठेच लागू नये याचसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,” असं दिया ‘रेहना है तेरे दिल मै’ या चित्रपटासंदर्भात म्हणाली होती.