महाराष्ट्राची ओळख आहे इथले सण आणि त्या सणांची ओळख आहे त्या त्या दिवशी बनवले जाणारे रुचकर पदार्थ. जसं गणेशोत्सव असेल तर मोदक, दिवाळी असेल तर चिवडा, चकली, नारळी पौर्णिमा असेल तर नारळी भात, होळी म्हटलं की पुराणपोळी…अगदी तसंच दसर्‍याच्या निमित्ताने एक चविष्ट, खुमासदार शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आज काय स्पेशल असं या शोचं नाव असून २५ ऑक्टोबरपासून शनिवार, रविवार दुपारी १ वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली खरे करणार आहे. तर पराग कान्हेरे यांच्या काही खास रेसेपीज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. पहिल्या भागामध्ये जीव झाला येडापिसा या लोकप्रिय मालिकेमधील आत्याबाई म्हणजेच चिन्मयी सुमित आणि सरकारची भूमिका साकारणारा रोहित हळदीकर येणार आहेत.

कार्यक्रमाची सूत्रसंचालक सोनाली खरे म्हणाली, “मला आनंद आहे की मी पुन्हा एकदा माझ्या आवडत्या टीव्ही क्षेत्रात परततेय. स्वयंपाक करणे हे कोणत्याही गृहिणीला आवडते. मी लॉकडाउनमध्ये बर्‍याच नवनवीन रेसिपीज शिकले. जणू या शोची रंगीत तालिम झाली होती आणि या कार्यक्रमामुळे मला माझ्या जुन्या सहकलाकारांसोबत स्क्रीन शेअर करायला मिळणार आहे याचा एक वेगळाच आनंद आहे.”