21 September 2020

News Flash

नाटय़रंग : आलाय मोठा शहाणा’ मॅडच्यॅप झिंगाट!

लेखक वैभव परब यांनी ‘आलाय मोठा शहाणा’ हे नाटक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठीच लिहिलंय यात शंका नाही

मनिषा चव्हाण, महेश कोकाटे, आशीष पवार, अपूर्वा नेमळेकर-देशपांडे आणि आनंदा कारेकर.

‘गावात भलताच दरारा असलेल्या दादासाहेबांच्या सिंड्रेला नामक थोराड कन्यकेचं अभ्यासात बिलकूल लक्ष नसतं. हिंदी चित्रपटांतल्या नायिकांसारखं कायम रोमॅण्टिक मूडमध्ये पुरुषांना गळाला लावण्यातच ती सगळा वेळ खर्च करत असते. त्यामुळे घोडनवरी झाली तरी तिची एस्सेस्सी काही पार होत नाही. दादासाहेबांना आणि तिच्या आईला तिनं काहीही करून एस्सेस्सी पास व्हावं असं खूप वाटत असतं. त्यासाठी मास्तरांच्या खासगी शिकवण्या लावूनही तिच्या अतरंगी वर्तनामुळे आणि अभ्यासात गम्य नसल्याने ती अद्याप एस्सेस्सी पास होऊ शकलेली नसते. शिकवणी लावूनही आपल्या कन्येला एस्सेस्सी पास करू न शकलेल्या मास्तरांवरच त्याचं खापर फोडून संतप्त झालेल्या दादासाहेबांनी उलट त्यांनाच ढगात पाठवलेलं असतं.
सिंड्रेला जोवर एस्सेसी पास होत नाही तोवर तिचं गुलाबरावशी (दादासाहेबांनी घरी पाळलेला त्यांचा रिकामटेकडा भाचा!) लग्न करून द्यायचं नाही, असा पणही दादासाहेबांनी केलेला असतो. त्यामुळे गुलाबरावही सिंड्रेला कधी एकदा एस्सेसी पास होतेय याकडे डोळे लावून बसलेला असतो. पण तिची लक्षणं पाहता ती या जन्मी एस्सेस्सी होईल ही शक्यता पार मावळलेली असते. मात्र, दादासाहेबांचे तिला एस्सेस्सी करण्याचे प्रयत्न अथकपणे जारी असतात. त्यासाठी एके दिवशी पंप्या (दादासाहेबांचा नोकर) गावातल्या एका गरीब बिच्चाऱ्या, परंतु हुशार मास्तरांना जबरदस्तीनं गोणत्यात घालून घेऊन येतो. या भयंकर प्रकारानं ते मास्तर अगदी गर्भगळित झालेले असतात. दादासाहेब त्यांना आपल्या मुलीची शिकवणी घ्यायला सांगतात. सिंड्रेलाचा एकूण नूर पाहता मास्तरांना कळून चुकतं, की या पोरीला शिकवणं आपल्याला कदापिही शक्य होणार नाही. ते तसं दादासाहेबांना सांगतात. तथापि दादासाहेब धाकदपटशा दाखवून मास्तरांना तिला शिकवायला राजी करतात. त्यांना आपल्या घरीच कोंडून ठेवतात. वर त्यांच्याकडून लिहून घेतात, की सिंड्रेलाला काहीही करून मी पास करून दाखवेनच. अन्यथा..
अर्थात सिंड्रेलाला शिकवणं ही अशक्यातलीच गोष्ट असते. शिकवू इच्छिणाऱ्या मास्तरांनाच ती आपल्या इश्काच्या जाळ्यात ओढू पाहते. त्यामुळे गुलाबराव पिसाटतो. मास्तरांच्या अंगावर धावून जातो. त्यांना भलत्या जागी जखमी करतो. सिंड्रेलाचं हे शिकवणी प्रकरण म्हणजे आपल्या प्राणांशी गाठ आहे हे मास्तरांना कळून चुकतं. या नस्त्या झमेल्यात अडकल्याबद्दल मास्तर स्वत:च्या नशिबालाच दोष देतात. तिथून पळून जाऊ पाहतात. परंतु त्यांचा बेत हाणून पाडला जातो.
शेवटी निरुपायानं ते सिंड्रेलाला तिच्या कलानंच शिकविण्याचा प्रयत्न करायचं ठरवतात. तिची हिंदी चित्रपटांची आणि त्यातल्या गाण्यांची आवड लक्षात घेऊन त्यांच्या आधारेच निरनिराळे विषय ते तिला शिकवू लागतात..
अर्थात पुढे काय होतं, हे सांगण्याची आवश्यकता नाही.
लेखक वैभव परब यांनी ‘आलाय मोठा शहाणा’ हे नाटक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठीच लिहिलंय यात शंका नाही. नाटकाचं कथाबीज, त्यातली पात्रं, त्यांचं बोलणं-वागणं, त्यांच्या चित्रविचित्र तऱ्हा यांतून नाटक फुलत जातं. तशात अशा प्रकारच्या नाटकांचे पीएच. डी.धारक दिग्दर्शक संतोष पवार यांच्या हाती ते पडल्यानं त्यांच्या दिग्दर्शकीय कौशल्याचीही त्यात मोठीच भर पडली आहे. संतोष पवार यांनीच हे नाटक लिहिलंय की काय असं वाटावं, इतकी त्याची रचना ‘पवारी शैली’त घोळलेली आहे. अशी मॅडच्यॅप कॉमेडी बसवणं हा पवार यांच्या डाव्या हातचा मळ आहे. त्यांनी कलाकारांच्या साथीनं रंगमंचावर असा काही धूडगुस घातला आहे, की प्रेक्षकांना क्षणभरही हास्य-गटांगळ्यांतून उसंत मिळत नाही. अगदी कलावंतांच्या निवडीपासूनच त्यांनी ‘नाथाघरची उलटी खूण’ सिद्ध केली आहे. पैलवानी व्यक्तिमत्त्वाचे आणि गुंडाछाप धमकीच्या भाषेतच सतत बोलणारे दादासाहेब, त्यांच्या अगदी उलट.. किरटय़ा देहयष्टीची त्यांची बायको (मामी), ‘गुलाबराव’ या भारदस्त नावाशी विशोभित असा प्रत्यक्षात काडीपैलवान; मात्र कायम सुपरमॅन, बॅटमॅन, क्रिश वा छोटा भीमच्या पेहेरावात वावरणारा त्यांचा होणारा जावई कम् भाचा, फटाकडी मुलगी सिंड्रेला, आगाऊ नोकर पंप्या, वरकरणी बावळट, परंतु अंगी नाना कळा असलेले मास्तर, ‘बीस साल बाद’ चित्रपटातल्यासारखं मास्तरांना भिवविण्यासाठी अधूनमधून कंदील हाती घेऊन काळोखातून इकडून तिकडे जाणारं आणि घरात कुठंही अचानकपणे प्रकटणारं गणपुले मास्तरांचं भूत अशी एकेक नग पात्रं संतोष पवार यांनी यात योजली आहेत. इथंच त्यांनी अर्धी लढाईही जिंकली आहे. याउप्पर त्यांच्याकडून जे काही करवून घ्यायचं, ते करवून घेण्यात तर ते उस्ताद आहेतच. सबब.. ही मॅडच्यॅप कॉमेडी प्रेक्षकांना खुर्चीला हसतखेळत खिळवून ठेवते. यात प्रसंगानुरूप केलेला गाण्यांचा वापर.. त्यातही शरीरशास्त्राची तत्त्वं शिकवताना ‘धक धक करने लगा’सारख्या लोकप्रिय गाण्यांचा केलेला वापर तर लाजवाबच! संतोष पवार यांच्या या दिग्दर्शकीय कल्पकतेला दाद द्यावी तेवढी थोडीच. डोकं बाजूला काढून ठेवून चार घटका मस्त करमणूक करवून घ्यायला आलेल्या प्रेक्षकांचं हे नाटक पैसावसूल मनोरंजन करतं, या विधानात बिलकूल अतिशयोक्ती नाही. (अशा नाटकांना गंभीर, समस्याप्रधान नाटकांचे वा बुद्धिगामी रंजन करणाऱ्या तल्लख विनोदी नाटकांचे निकष लावणं सर्वथा चुकीचं आहे. याकरता नाटकाला जाताना प्रेक्षकानं आपल्याला नेमकं नाटकाकडून काय अपेक्षित आहे, याची आधीच खातरजमा केलेली बरी.)
संदेश बेंद्रे यांनी दादासाहेबांच्या घराच्या नेपथ्यातून पात्रांना यथेच्छ बागडायला मिळेल असा रंगावकाश उपलब्ध करून दिला आहे. शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजनेतून नाटय़पूर्ण क्षण उजळवले आहेत. राजेश देशपांडे आणि संतोष पवार यांच्या गीतांना अमीर हडकर यांनी ठेकेबाज चाली दिल्या आहेत. संपदा जोगळेकर यांच्या नृत्य-आरेखनानं या गाण्यांच्या ठसकेबाजपणात आणखीनच भर पडली आहे. महेश शेरला यांनी नाटकाचं कूळ ओळखून पात्रांना वेशभूषा केली आहे. शरद सावंत यांच्या रंगभूषेनं पात्रांना ‘चेहरा’ दिला आहे.
आशीष पवार यांनी वरपांगी सरळमार्गी, बावळट, परंतु अंतरंगी नाना कळा असलेला ‘स्मार्ट’ मास्तर त्याच्या सगळ्या कळांसकट उत्तमरीत्या साकारला आहे. प्रेक्षकानुनयी अभिनय कसा करावा याचा तो वस्तुपाठ ठरावा. रंगमंच सतत हलता-बोलता, सळसळता आणि हास्यस्फोटांनी खळाळता ठेवण्यात त्यांनी कसलीच कसर सोडलेली नाही. ‘अधांतर’मधला बटर ते यातला मास्तर हा त्यांचा प्रवास दिङ्मूढ करणारा आहे. अपूर्वा नेमळेकर-देशपांडे यांची वाया गेलेली सिंड्रेला लोभस तर आहेच; त्याचबरोबर चंगीभंगीपणाचे विभ्रमही त्यांनी या भूमिकेत मस्तच वापरले आहेत. आनंदा कारेकर (गुलाबराव) यांनी आपल्या फाटक्या देहसंपदेचा भन्नाट वापर करत आपल्या वाटय़ाचे हशे चोखपणे वसूल केले आहेत. पंप्याच्या भूमिकेत नितीन जाधव यांनीही धम्माल केली आहे. दादासाहेब झालेले महेश कोकाटे भूमिकेत शोभले आहेत खरे; परंतु त्यांची संवादोच्चाराची शैली काहीशी रसभंग करते. मनिषा चव्हाण (मामी) आणि विनोद दाभिळकर (गणपुले मास्तर) यांनीही छान साथ केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2016 12:17 am

Web Title: aala motha shahana marathi play review by ravindra parthe
Next Stories
1 ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिका हॉलीवूडला आवडतील’अनिल कपूरचा विश्वास 
2 ‘डॉन २’च्या चित्रीकरणादरम्यान सापडली ‘लालबागची राणी’
3 एक कलाकार, सहा नाटके आणि पाच अभिनेते..!
Just Now!
X