बॉलीवूड अभिनेता आमिर खानने सत्यमेव जयते या कार्यक्रमाबाबत काही अफवा पसरवल्या जात आहेत, अशी तक्रार मुंबई पोलिसांकडे केली आहे. मात्र, आमिरने यासंदर्भातील अतिरिक्त माहिती द्यावी त्यानंतर आम्ही तक्रारीची दखल घेऊ असे वरिष्ठ पोलिस अधिका-याने म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमाच्या शेवटी जमा केली जाणारी देणगी ही सर्व समुदायाकडील लोकांकडून येते. मात्र, असे असतानाही ही देणगी केवळ एका विशिष्ट समाजाची धार्मिक इमारत बांधण्यासाठी वापरण्यात येत आहे, अशा प्रकारची माहिती फेसबुक या सोशल साइटवर काही लोक पोस्ट करत आहेत. शुक्रवारी आमिरने त्याच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट केले की, खोटे आणि दुर्भावनायुक्त संदेश वॉट्स अप, फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल साइटद्वारे पसरवले जात आहेत. सत्यमेव जयते कार्यक्रमाद्वारे जमा केला जाणारा निधी हा उपयोगी आणि निधर्मी कामासाठी वापरला जात आहे.

आमिरने शनिवारी या संदेशासंबंधी सहआयुक्त (कायदा-सुव्यवस्था) सदानंद दाते यांची भेट घेतली. यासंबंधी चौकशीस सुरवात करण्यात आली आहे. ‘आम्ही तक्रारीची नोंद करून घेतली असून सदर तक्रार सायबर क्राइम अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आले आहे. आमिरला आम्ही अजून अतिरिक्त माहिती देण्यास सांगितले आहे. जेणेकरून आम्ही त्या तक्रारीची दखल घेऊन त्यासंबंधी माहिती गोळा करू शकू,’ असे सदानंत दाते म्हणाले.

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.