आमिर खान बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जातो. हा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ सहसा पार्टी, अवॉर्ड शो आणि रिअॅलिटी शोपासून चार हात लांब राहतो. कोणत्याही कार्यक्रमात आमिर यापूर्वी फारच क्वचितच दिसला असेल. मात्र गेल्या काही दिवसांपासून आमिर स्वत:चा हाच नियम तोडताना दिसत आहे. आमिर करणच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये पुन्हा एकदा उपस्थिती लावताना दिसणार आहे.

करणनं आपल्या विशेष पाहुण्याचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे करणच्या नव्या सिझनमध्ये आमिरकडून कोणती गुपितं काढून घेण्यास करण यशस्वी ठरतो याची उत्सुकता सगळ्यांना लागून आहे. आमिरचा ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे आणि त्याच्याच प्रमोशनसाठी आमिर कॉफी विथ करणच्या नव्या सिझनमध्ये येणार आहे.

यापूर्वी ‘दंगल’च्या प्रमोशनसाठी आमिरनं करणच्या ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. ‘कॉफी विथ करण’च्या सहाव्या सिझनची सुरूवात २१ ऑक्टोबरपासून होत आहे. हा सिझन खऱ्या अर्थानं वेगळा ठरणार आहे कारण यात दीपिका- आलिया, सैफ- सारा, अर्जुन- जान्हवी, रणवीर- अक्षय अशा जोड्या पाहायला मिळणार आहे.