News Flash

चीनी बाजारात ९०० कोटींचा ‘आमिर’ खेळ

बॉलीवूडपटांसाठी सातासमुद्रापार मार्केट शोधायला सुरुवात झाली त्याला फार काळ लोटलेला नाही.

बॉलीवूडपटांसाठी सातासमुद्रापार मार्केट शोधायला सुरुवात झाली त्याला फार काळ लोटलेला नाही. ‘कान’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने थेट तिथे कार्यालय उघडून चित्रपट विकण्याचे प्रयत्नही झाले. मात्र हिंदी चित्रपट परदेशात प्रचंड यशस्वी ठरलेत, असं कधी झालं नाही. तो चमत्कार गेल्या वर्षभरात आमिर खानने दोनदा करून दाखवला आहे. आमिरने ‘दंगल’ चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित केला आणि त्या चित्रपटाने तब्बल १९१ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली. त्यानंतर त्याने आपला ‘सिक्रेट सुपरस्टार’ हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित केला. ‘सिक्रेट सुपरस्टार’ने देशभरातून ६३.४० कोटी रुपयांची कमाई केली, कमी बजेटमध्ये तयार होऊनही सर्वाधिक कमाई केल्याने सुपरहिट चित्रपटांमध्येच त्याची गणना झाली असली तरी चीनच्या तिकीटबारीवर या चित्रपटाने अवघ्या चार आठवडय़ांत साडेसातशे कोटींपेक्षा जास्त कमाई करत नवा विक्रम नोंदवला आहे. चीनमध्ये आपला दबदबा निर्माण करण्यात आमिर खान या एकटय़ा बॉलीवूड अभिनेत्याला यश आले आहे.

हॉलीवूड चित्रपटांसाठी आजवर चीन ही एक मोठी बाजारपेठ राहिली आहे. चीनमध्ये एक तर मोठमोठे हॉलीवूडपट प्रदर्शित होतात किंवा चिनी चित्रपट प्रदर्शित होतात, मात्र गेल्या काही वर्षांत चिनी चित्रपट इंडस्ट्रीला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे अर्थातच हॉलीवूडपटांचे तिथले पारडे जड झाले असताना आमिरच्या चित्रपटांना मिळालेल्या एकहाती यशामुळे भल्याभल्यांना घाम फुटला आहे. खुद्द आमिर खानलाही चीनमध्ये आपल्या चित्रपटाला इतके यश मिळेल, अशी अपेक्षा नव्हती. ‘सिक्रेट सुपरस्टार’ हा अद्वैत चंदन दिग्दर्शित चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित झाला आणि पहिल्याच आठवडय़ात त्याला चांगला प्रतिसाद मिळाला तेव्हाच खरं म्हणजे आमिरच्या टीमने त्याच्याकडे पार्टी मागायला सुरुवात केली होती. मात्र त्या वेळी चित्रपटाने शंभर कोटी कमावले तर पार्टी देईन, असे आमिरने त्यांना गमतीत सांगितले. हा आकडा चित्रपटाने लगेचच पार केला आणि फक्त चार आठवडय़ांत चित्रपटाने ७५०.६९ कोटींचा पल्ला गाठला होता. आता तर या चित्रपटाने जवळपास ९०० कोटींची कमाई केली असल्याची चर्चा सुरू झाली असल्याने आमिरनेही त्याच्या टीमसह बॉलीवूडमधील निवडक कलाकारांना पार्टी देण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या तो ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’च्या चित्रीकरणात व्यग्र आहे तरीही पुढच्या आठवडय़ात २०-२१ फेब्रुवारीला आमिर आपल्या चित्रपटाच्या चिनी यशाचा सोहळा साजरा करणार आहे.

आमिरच्याच चित्रपटांना यश का? हा प्रश्न साहजिक आहे, मात्र अजून बॉलीवूडमधील अन्य कोणी चीनमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार केला नव्हता. आमिरने याआधी जपानमध्ये चित्रपट प्रदर्शित केले आहेत. सलमान खान आणि शाहरूख खान या दोघांनीही आपापले चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित केले होते. त्यानंतर आमिरने ‘पीके’ जपानमध्ये प्रदर्शित केला. मात्र ‘दंगल’ चित्रपट त्याने ‘शुआजियाओ, बाबा’ (लेट्स रेसल डॅड) नावाने प्रदर्शित केला आणि या चित्रपटाने अक्षरश: हॉलीवूडपटांचेही विक्रम मोडीत काढले आणि चिनी चित्रपटांचेही विक्रम मोडले. गेल्या वर्षी मे महिन्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने १९१ दशलक्ष डॉलर्सची कमाई चीनमध्ये केली. खरं म्हणजे त्या वेळी निर्माता म्हणून आमिरला जास्त फायदा झाला नव्हता. या वेळी ‘सिक्रेट सुपरस्टार’ चित्रपटासाठी त्याला अधिक आर्थिक फायदा होईल, असे सांगितले जाते. चीनमध्ये चित्रपट प्रदर्शित केल्यानंतर एकूण चित्रपटाच्या उत्पन्नापैकी २५ टक्के वाटा हा निर्मात्याला मिळतो. मात्र तशी तरतूद त्याला ‘दंगल’ चित्रपटासाठी मिळाली नव्हती. हा चित्रपट यशस्वी ठरल्यानंतर मात्र आमिर खानकडे त्यांचे लक्ष वेधले गेले आणि दुसऱ्या चित्रपटासाठी त्याला हा २५ टक्के वाटा असलेली तरतूद लागू करण्यात आली. त्यामुळे या वेळी आमिरला कराची रक्कम वगळून कमीत कमी १४० कोटी रुपये हातात येतील. परदेशात चित्रपट प्रदर्शनापोटी मिळणारी ही सगळ्यात मोठी रक्कम असल्याचे बोलले जाते. सध्या तरी हे चिनी मार्केट एकटय़ा आमिर खानला फळले असले तरी निदान या यशामुळे आता बॉलीवूडजन चीनची वाट नक्की धरतील यात शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2018 12:48 am

Web Title: aamir khan movie in china
Next Stories
1 आम्ही दोघी!
2 सचिन-स्वप्निलची ‘नं. १ यारी’
3 ‘क्वॉर्टर’ या लघुपटात गिरिजा ओक -गोडबोले
Just Now!
X