काही महिन्यांपूर्वीच बॉलीवूडचा मि.परफेक्टशनिस्ट आमिर खानने ‘दंगल’ या आगामी चित्रपटासाठी २५ किलो वजन वाढवले होते. परंतु तो आता याच चित्रपटातील काही भागासाठी पुन्हा २५ किलो वजन कमी करणार आहे. यासाठी त्याच्याकडे २५ आठवड्यांचा कालावधी असून, त्याच्या विशेष आहाराकरिता एका खास आचा-याची नेमणूक करण्यात आली आहे.
आमिर या चित्रपटात महावीर फोगट या कुस्तीपटूच्या भूमिकेत दिसेल. ५५ वर्षीय व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारत आमिरने पहिल्या भागाचे चित्रीकरण पूर्ण केले असून, राहिलेल्या भागासाठी आमिरला तरुण व्यक्तिरेखा साकारावी लागणार आहे. त्याकरिता त्याला पुन्हा त्याच्या शरिरयष्टीत बदल करावा लागत आहे. कुस्तिपटूसारखी शरीरयष्टी कमविण्याकरिता आमिरला विशिष्ट आहार घ्यावा लागत असून, त्याचे तो सातत्याने पालन करतोय. आमिर आणि चित्रपटात त्याच्या कुस्तिपटू मुलींची भूमिका साकारणा-या अभिनेत्रींना त्यांच्या वैयक्तिक आवश्यकतेनुसार विशेष आहार दिला जात आहे. याव्यतिरीक्त आमिर रोज सकाळी एक तास व्यायाम करत असून वजन कमी करण्यासाठी कठोर पथ्यांचे पालन करतोय.
डिस्नी आणि आमिर खान प्रॉडक्शनची निर्मिती असलेला ‘दंगल’ हा चित्रपट २३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे