बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. सुशांतने घेतलेल्या या निर्णयामुळे कलाविश्वातील प्रत्येकालाच धक्का बसला आहे. त्यामुळे सुशांतच्या कुटुंबीयासह सुशांतच्या जवळच्या मित्र-परिवारावर शोककळा पसरली आहे. सुशांतच्या मृत्युनंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेची अवस्था कशी झाली आहे हे सुशांत आणि अंकिताच्या जवळच्या मैत्रिणीने सांगितलं आहे.
अभिनेत्री आणि बिग बॉस १३ ची स्पर्धक आरती सिंग हिने सुशांतच्या मृत्युनंतर अंकितासोबत संपर्क साधला होता. यावेळी अंकिता सुशांतच्या निधनामुळे खचून गेल्याचं आरतीने ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या मुलाखतीत सांगितलं.
“माझी आणि सुशांतची ओळख अंकितामुळे झाली होती. तो फार चांगला मुलगा होतो. प्रत्येक गोष्टीत पाठिंबा द्यायचा. सुशांत गेल्यानंतर मी अंकिताला फोन केला होता. त्यावेळी ती ठीक असून तिला थोडासा वेळ हवाय असं मला जाणवलं. त्यामुळे एक मैत्रीण असल्यामुळे मी तिला तिचा वेळ देतीये”, असं आरतीने सांगितलं.
दरम्यान, सोमवारी (६जुलै) सुशांतच्या ‘दिल बेचारा’ या अखेरच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे कमी कालावधीत हा ट्रेलर सर्वाधिक वेळा पाहिला गेला आहे.