१९९३ साली प्रदर्शित झालेला ‘डर’ हा चित्रपट शाहरुखच्या करिअरमधील सर्वांत महत्त्वाचा चित्रपट ठरला होता. या चित्रपटातील शाहरुखची खलनायकाची भूमिका त्यावेळी प्रचंड गाजली होती. विशेष म्हणजे याच भूमिकेमुळे त्याच्या करिअरला एक नवीन कलाटणी मिळाली. परंतु शाहरुखपूर्वी या भूमिकेसाठी अन्य एका अभिनेत्याची निवड करण्यात आली होती. ‘द कपिल शर्मा’च्या मंचावर ‘आशिकी’फेम राहुल रॉयने या गोष्टीचा खुलासा केला.

‘कपिल शर्मा शो’मध्ये अनेक सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटांचं प्रमोशन करण्यासाठी येत असतात. त्यातच ‘आशिकी’ चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या चित्रपटाच्या टीमने ‘कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी राहुल रॉय, अनु अग्रवाल आणि दिपक तिजोरी या कलाकारांनी ९० च्या दशकातील त्यांच्या काही आठवणींना उजाळा दिला. त्यात राहुलनेदेखील शाहरुखपूर्वी त्याला ‘डर’ चित्रपटाची ऑफर आल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर त्याने हा चित्रपट नाकारल्यामुळे शाहरुखची या चित्रपटासाठी निवड झाल्याचं तो म्हणाला.

”आशिकी’ प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास सहा महिने माझ्याकडे काम नव्हतं. परंतु अचानकपणे माझ्याकडे ४९ चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. यामध्ये दिग्दर्शक यश चोप्रा यांनी मला त्यांच्या ‘डर’ चित्रपटासाठी बोलावलं होतं. परंतु या काळात मी बऱ्याच चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त होतो. त्यामुळे यश चोप्रा यांच्या चित्रपटासाठी मला नकार द्यावा लागला. माझ्या नकारानंतर हा चित्रपट शाहरुखला ऑफर करण्यात आला”, असं राहुलने सांगितलं.

पुढे तो म्हणतो, “डरमुळे शाहरुखच्या करिअरची दिशा बदलली. मात्र ‘डर’सारखा चित्रपट नाकारणं ही माझी खूप मोठी चूक होती. त्यामुळेच आजही हा चित्रपट नाकारल्याची खंत मला सतावते”.

वाचा : जया बच्चन यांच्यामुळे अभिषेक-करिश्माचा साखरपुडा मोडला का?

दरम्यान, ‘डर’ चित्रपटात शाहरुखसोबत जुही चावला आणि सनी देओलने स्क्रीन शेअर केली आहे. तर अनुपम खेर आणि अनु कपूर हेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत. ‘डर’ चित्रपटात सनीने जुही चावलाच्या पतीची भूमिका साकारली होती. तर शाहरुखने तिच्या एकतर्फी प्रियकराची भूमिका केली होती.