अभिजीत केळकर हा मराठीतला नामवंत कलाकार व प्रतिभावान गायकसुद्धा आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने ‘सिंगिंग स्टार’ या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. मात्र शोदरम्यान त्याला करोनाची लागण झाल्याने काही दिवस उपचारानिमित्त रुग्णालयातच क्वारंटाइनमध्ये राहावं लागलं होतं. अभिजीत आता पूर्णपणे बरा झाला असून रुग्णालयातील एक आठवड त्याने चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

‘खेळ मांडला’ हे मराठी गाणं गात असतानाचा हा व्हिडीओ अभिजीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ‘अजय-अतुल यांचा विशेष एपिसोड होता. हॉस्पिटलमधील रुममध्ये मी रियाज करत होतो. दुर्दैवाने मी त्या एपिसोडमध्ये अजय-अतुल यांच्यासमोर हे गाणं गाऊ शकलो नव्हतो. पण गाण्यातल्या प्रत्येक ओळीचा अर्थ मला चांगलाच उमगला होता’, असं त्याने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं.

‘सिंगिंग स्टार’ या शोमध्ये अजय-अतुल या जोडगोळीने हजेरी लावली होती. त्यानिमित्त त्यांची गाणी स्पर्धकांनी सादर केली होती. करोनाची लागण झाल्यानंतर अभिजीत महापालिकेच्या रुग्णालयात १४ दिवसांसाठी क्वारंटाइन झाला होता.