गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेता अभिषेक बच्चन याच्या ‘ब्रीद : इन टू द शॅडोज’ या वेबसीरिजची जोरदार चर्चा सुरु होती. या सीरिजच्या माध्यमातून अभिषेक वेब विश्वात पदार्पण करत आहे. काही दिवसांपूर्वीच या सीरिजमधील अभिषेकचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. त्याचा हा लूक पाहून प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा रंगली होती. त्यानंतर आता या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा ट्रेलर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये अपहरण करण्यात आलेल्या एका मुलीची आणि तिला शोधण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या वडिलांची कथा दाखविण्यात आली आहे. एका त्रिकोणी कुटुंबातील लहान मुलीचं अपहरण होतं. या मुलीला शोधण्यासाठी तिचे वडील कसोशीने प्रयत्न करतात. मात्र त्यांचा हा प्रवास नेमका कुठपर्यंत जातो हे सीरिज पाहिल्यानंतरच उलगडणार आहे.

दरम्यान, सायकॉलॉजिकल क्राइम थ्रिलर असलेली ही सीरिज येत्या १० जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये अभिषेक बच्चनसह सयामी खेर आणि निथ्या मेनन देखील झळकणार आहे. निथ्या मेननचादेखील हा डिजिटल डेब्यु असल्याचं म्हटलं जात आहे. या सीरिजची निर्मिती अबुंदंतिया एन्टरटेन्मेंट यांनी केली असून दिग्दर्शन मयांक शर्मा यांनी केलं आहे.