अभिषेक बच्चनची मुख्य भूमिका असलेली ‘ब्रीद : इन टू द शॅडोज’ ही वेबसीरिज अलिकडेच प्रदर्शित झाली. १० जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या सीरिजने अनेकांची मनं जिंकली आहे. या सीरिजच्या माध्यमातून अभिषेकने वेब विश्वात पदार्पण केलं असून तो पहिल्यांदाच एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आले. विशेष म्हणजे कमी कालावधीत लोकप्रिय झालेल्या या सीरिजचा आता तिसरा सीझनदेखील प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
सायकॉलॉजिकल क्राइम थ्रिलर असलेली ही सीरिज प्रेक्षकांच्या मनावर भूरळ घालण्यास यशस्वी ठरली आहे. त्यामुळे याचा पुढचा सीझन प्रदर्शित होणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. त्यातच या सीरिजच्या शेवटच्या भागात C-16 असा सूचक संदेश देण्यात आला होता. त्यामुळे खरंच या सीरिजचा नवा भाग प्रदर्शित होणार असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.
C-16
— Abhishek Bachchan (@juniorbachchan) July 29, 2020
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चननेदेखील असंच कुतूहल निर्माण करणारं ट्विट केलं होतं. परंतु, अद्यापतरी या विषयी कोणतीही अधिकृत माहिती स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे खरंच ‘ब्रीद : इन टू द शॅडोज’चा तिसरा सीझन येणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.