बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी जोडप्यांपैकी सर्वांच्याच आवडीची एक जोडी म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय. ‘बंटी और बबली’ या चित्रपटामध्ये ‘कजरा रे’ या गाण्याच्या निमित्ताने एकत्र काम केल्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याच जवळीक निर्माण झाली होती. ज्यावेळी या दोघांनीही मणिरत्नम यांच्या ‘गुरु’ चित्रपटामध्ये एकत्र काम केले त्यावेळी तर अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबाबत अनेकांनाच माहित झाले होते. या जोडीसाठी चाहत्यांमध्ये असणारे कुतुहल आणि दिवसेंदिवस अॅश- अभिषेकच्या प्रेमाच्या चर्चा यांचा निकाल लागला तो म्हणजे ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाच्या रुपात. बॉलिवूड वर्तुळातील काही यशस्वी आणि प्रेक्षकांच्या पसंतीपैकीच एक असणाऱ्या या सेलिब्रिटी जोडीने आजवर अनेकांचीच मने जिंकली आहेत. ऐश्वर्या – अभिषेकचा इतक्या वर्षांचा यशस्वी वैवाहिक जीवनाचा प्रवास आणि या प्रवासामध्ये आलेल्या काही आठवणींना उजाळा देत अभिषेकने नुकतेच एक सुंदर ट्विट केले होते.

ऐश्वर्याने ज्यावेळी अभिषेकला लग्नासाठी होकार दिला होता त्याच वेळीच्या आठवणींना उजाळा देत अभिषेकने ट्विट केले होते की, ‘दहा वर्षांपूर्वी न्यू यॉर्कच्या गोठवण्याऱ्या थंडीत एका बाल्कनीमध्ये तीने मला होकार दिला होता’. अभिषेकच्या या ट्विटनंतर त्याच्या आणि ऐश्वर्याच्या नात्याविषयीच्या चर्चा रंगू लागल्या. काही चित्रपटांमध्ये या रिअल लाइफ जोडीने एकत्र काम केले असून त्यांच्या ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन केमिस्ट्रिने नेहमीच अनेकांचे लक्ष वेधले आहे. २० एप्रिल २००७ मध्ये विवाहबद्दध झालेल्या या जोडीच्या लग्नाला यंदाच्या एप्रिल महिन्यात दहा वर्षे पूर्ण होणार आहेत.

वाचा: ऐश्वर्याचं सासर सुरेख बाई..

वैवाहिक जीवनानंतर काही काळ ऐश्वर्या चित्रपटांपासून दूर राहिली होती. पण तिने पुन्हा एकदा बी टाऊनमध्ये पदार्पण करत चित्रपटसृष्टीमध्ये अनेकांचेच लक्ष वेधले होते. आता अॅश आणि अभिषेकचे चाहते या स्टार कपलला पुन्हा एकदा चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.