ठो-ठो, स्स् स्स्, ढिश्क्याँव, ढॅणढॅण, ठॉप-ढॉप हे आवाज ‘अ‍ॅक्शन जॅक्सन’ चित्रपटाचे नाव सार्थ ठरवत सतत तीन तास कानांवर आदळत राहतात आणि त्या जोडीला भयंकर कर्कश संगीत आणि तितकेच भडक, डोळ्याला भोकं पाडणाऱ्या गडद रंगांची पखरण पडद्यावर होत राहते आणि या सगळ्या कर्कश वातावरणात बसून डोक्याचा भुगा न झाला तरच नवल. ‘सिंघम’फेम अजय देवगणची प्रतिमा अ‍ॅक्शन हिरो म्हणून अधिक ठसविणारा चित्रपट असला तरी तो जॅक्सन बनून नाचायला लागला की प्रेक्षकांना जीव नकोसा होता. प्रभुदेवा दिग्दर्शक आहे म्हटल्यावर नृत्य, भडक दाक्षिणात्य रंगांचे कपडे, मारामारी-नृत्य, मग परत नृत्य-मारामारी अशा पद्धतीने सिनेमा झेलावा लागतो.
दाक्षिणात्य चित्रपटांचा हिंदी डब केलेला डोस टीव्ही वाहिन्यांवरून दररोज प्रेक्षकांना मिळत असतोच. प्रभुदेवा म्हणजे नृत्य हे समीकरण प्रेक्षकांना चांगलेच माहीत आहे. नृत्यासाठी करावी लागणार मेहनतही मान्यच आहे. परंतु मारधाडपटामध्ये नृत्याला किती महत्त्व द्यावे हे दिग्दर्शक म्हणून प्रभुदेवाला कळलेले नाही. दाक्षिणात्य मसालापटांचा भडिमार करीत आणि उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करूनही कथा-पटकथा, सूत्र या गोष्टींना अजिबात थारा न दिल्यामुळे तर्कविसंगत प्रकार पाहत बंदुकीच्या फैरी झाडत, नाहीतर तलवारीने सपासप वार करण्याची दृश्ये आणि आवाज आणि कर्णकर्कश पाश्र्वसंगीत ऐकत तीन तास चित्रपट झेलणे केवळ असह्य़ न ठरले तरच नवल. आता चित्रपटाच्या नावावरून उत्तमपैकी मारामारीचे प्रसंग, नायक-खलनायक यांची हाणामारीची जुगलबंदी धमाल आणेल असे वाटत असेल तर काही प्रमाणात तसे पाहायला मिळते. परंतु, निव्वळ तर्कविसंगतपणामुळे हाणामारीच्या प्रसंगाची मजा लुटता येत नाही.
अक्षय कुमार, सलमान खान आणि आता अजय देवगण अशा एक सो एक सुपरस्टार कलावंतांसोबत दाक्षिणात्य मसालापट हिंदीत करण्याचा धडाकाच जणू प्रभुदेवाने लावला आहे. त्यात भर म्हणून चिवित्र दिसणारा खलनायक आणि तीन-तीन नायिका असा एक वेगळाच प्रयोग प्रभुदेवाने केला आहे.
विशी आणि खुशी अचानक एका मॉलमध्ये भेटतात. विशी म्हणजे अजय देवगण आणि खुशी म्हणजे सोनाक्षी सिन्हा. तर ते एका मॉलमध्ये एका विवक्षित निमित्ताने समोरासमोर येतात आणि दोन-तीन दिवसांत खुशी विशीच्या प्रेमात पडते. शेवपुरीमध्ये रम ओतून पिणारा विशी गुंड आहे, खुशी कोण आहे ते शेवटपर्यंत प्रेक्षकांना कळू नये याची काळजी (?) दिग्दर्शकाने घेतली आहे. आधी सोनाक्षी सिन्हासोबत, नंतर मध्येच यामी गौतम आणि नंतर लगेच चिवित्र दिसणाऱ्या खलनायकाच्या बहिणीच्या भूमिकेतील मनस्वी ममगाईसोबत कधी विशी म्हणून तर कधी एजे म्हणून अजय देवगणचा सिनेमातील वावर दिसतो. अ‍ॅक्शन हिरो अजय देवगण एका य:कश्चित चिवित्र दिसणाऱ्या खलनायक आणि त्याच्या टोळीच्या लोकांशी मारामारी करत पाहत राहणे आणि मधेमधे अजय देवगणचे भयंकर नृत्यकौशल्य (?) पाहत राहण्याची वेळ प्रेक्षकांवर येत राहते. त्यामुळे चित्रपटगृहातून बाहेर पडल्यानंतर बंदुकीच्या फैरी झाडण्याचे आवाज, तलवारीने वार करण्याचे आवाज आणि कशावर तरी खलनायकांचे आदळणे त्यामुळे होणारे आवाज कानात घुमत राहतात इतकेच काय ते. याला करमणूक म्हणा, मनोरंजन म्हणा, मारामारीचा प्रभुदेवा स्टाइल तडका म्हणा, काय म्हणायचे ते प्रेक्षकांनी म्हणावे, आम्ही मात्र असाच सिनेमा बनवत राहणार असा जणू चित्रपटकर्त्यांचा इरादा दिसतो.

अ‍ॅक्शन जॅक्सन
निर्माते – विक वालिया गोर्धन, तनवानी, सुनील लुल्ला
दिग्दर्शक – प्रभुदेवा
पटकथा – प्रभुदेवा, शिराज अहमद, ए.सी. मुघिल
कथा – ए. सी. मुघिल
संगीत – हिमेश रेशमिया
छायालेखन – विजय कुमार अरोरा
कलावंत – अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा, यामि गौतम, कुणाल रॉय कपूर, मनस्वी ममगाय, केतन करंडे, आनंद राज, पुरु राजकुमार.