News Flash

अ‍ॅक्शन स्टंट सोपे नसतात बॉस..

प्रेक्षकवर्गाला रोहित शेट्टीने ‘गोलमाल’, ‘सिंघम’, ‘बोलबच्चन’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटांमधून अ‍ॅक्शन आणि विनोद यांची एकत्रित मेजवानी देऊ केली.

| February 1, 2015 02:29 am

‘चित्रपट म्हणजे पोट धरून हसायला लावणे किंवा थरारक अ‍ॅक्शन’ असे दोनच प्रकार मानणाऱ्या प्रेक्षकवर्गाला रोहित शेट्टीने ‘गोलमाल’, ‘सिंघम’, ‘बोलबच्चन’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटांमधून अ‍ॅक्शन आणि विनोद यांची एकत्रित मेजवानी देऊ केली. प्रत्यक्ष जीवनातही रोखठोक आणि बिनधास्त असलेला रोहित ‘खतरों के खिलाडी- डर का ब्लॉकबस्टर’ या ‘कलर्स’ वाहिनीवरील शोमधून टीव्हीवर परतत आहे. टीव्हीवरील लोकप्रिय कलाकारांकडून विविध प्रकारचे साहसी स्टंट करवून त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची चाचणी घेणाऱ्या या शोमध्ये तो सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. रोहितचे अ‍ॅक्शनपटांवरील प्रेम सर्वश्रुत आहे. यानिमित्ताने चित्रपट असो किंवा टीव्हीवरचा शो अ‍ॅक्शन स्टंट करणे हे सोपे नसते, त्यामुळे प्रेक्षकांनी अ‍ॅक्शन स्टंट्सकडे आणि स्टंटमनच्या कामाकडे गंभीरतेने पाहण्याची गरज त्याने बोलून दाखवली.
   एरवी पडद्यामागे राहणाऱ्या दिग्दर्शक रोहितचे खरे स्वरूप शोच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येते. एखाद्या परीक्षकाप्रमाणे समोरच्या स्पर्धकावर डाफरण्यापेक्षा त्यांच्याशी मित्राप्रमाणे संवाद साधण्याची, गरज पडल्यास त्यांना मार्गदर्शन करण्याची त्याची वृत्ती मागच्या पर्वामध्ये प्रेक्षकांना भावली होती. त्यामुळे शोच्या नव्या पर्वाची ते आतुरतेने वाट पाहत होते. रोहितही या पर्वाबद्दल कमालीचा उत्सुक होता. अर्थात यामागचे कारण विचारल्यावर, यंदाच्या पर्वामध्ये आमचा कोणताही अ‍ॅक्शन स्टंट वाया गेला नसल्याचे समाधान असल्याचे तो सांगतो.
विनोद आणि अ‍ॅक्शन या दोन्ही प्रकारांवर रोहितचे सारखेच प्रेम आहे. विनोदाच्या बाबतीत तो उत्स्फूर्त विनोदनिर्मितीला प्राधान्य देतो. जर सीन वाचून आपल्याला हसू येत असेल, तर प्रेक्षकाला हसू येणारच, हे तो आत्मविश्वासाने सांगतो. पण अ‍ॅक्शनचा विषय निघताच तो किंचित जास्त भावनिक होतो, ते स्टंटमनसाठी. ‘माझ्या चित्रपटांमध्ये लोकांना गाडय़ा उडताना पाहून ‘याच्या चित्रपटांमध्ये केवळ गाडय़ा उडत असतात,’ असे बोलले जाते, पण प्रेक्षकांनी लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येक गाडीत स्टंटमन बसलेला असतो, जो केवळ तुमच्या मनोरंजनासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालत असतो,’ हे तो स्पष्टपणे सांगतो. रोहितला अ‍ॅक्शन या प्रकाराचे बाळकडू त्याच्या वडिलांकडून मिळाले आहे. त्याचे वडील मधू बलवंत शेट्टी सत्तरीच्या दशकातील बॉलीवूडमधील नावाजलेले स्टंट डायरेक्टर आणि खलनायक होते. त्यांच्याकडून मिळालेला हा वारसा रोहितने उत्तमरीत्या पुढे चालविला. चित्रपटांमधील अ‍ॅक्शन स्टंट्सबद्दल बोलत असतो, तेव्हा हे स्टंट्स तयार करताना त्याने केलेली मेहनत त्याच्या शब्दांमधून व्यक्त होत असते. चित्रपटांमध्ये उडणाऱ्या गाडय़ा या नेहमीच्या गाडय़ा नसतात, त्यांचे इंजिन, यंत्रप्रणाली सर्व वेगळे असते. त्यात पेट्रोल किती असायला हवे, किती आग लागणे गरजेचे आहे याचाही बारकाईने अभ्यास होत असल्याचे तो सांगतो. अर्थात हे सांगताना त्याच्या डोळ्यांत दिसणारी चमक, त्याने या सर्वाचा किती बारकाईने अभ्यास केला आहे हे सांगून जाते.
   त्यामुळेच कदाचित या शोच्या मागच्या पर्वात काही स्टंट पूर्ण न झाल्यामुळे तो नाराज झाला होता. ‘प्रेक्षकांना केवळ मुख्य शो दिसतो, पण शो चित्रित करण्याच्याही आधी तब्बल तीन महिने मी किंवा माझे सहकारी प्रत्येक स्टंट बारकाईने तयार करीत असतो. त्या स्टंटमधील प्रत्येक शक्यता तपासून पाहिली जाते. कित्येकदा तर एखादा स्टंट तयार करायला आम्हाला संपूर्ण महिना द्यावा लागतो. मगच तो स्पर्धकाला करायला सांगितला जातो,’ असे सांगताना इतकी मेहनत घेतल्यावर जर काही कारणाने तो स्टंट पूर्ण झाला नाही, तर त्याला होणारे दु:ख साहजिक असल्याचे समोरच्यालाही पटते. अ‍ॅक्शन स्टंट म्हटले की, जिवावर उदार होणे आलेच, पण कोणताही स्टंट तयार करताना त्याच्या परिणामांची आणि त्यावरील उपायांची पूर्ण तयारी करीत असल्याचे तो सांगतो. ‘अपघात होईलच, हा आमचा पहिला विचार असतो, मग तो होऊ नये म्हणून काय करता येईल, हे आम्ही पाहतो,’ असे सांगताना स्टंट करणाऱ्या स्टंटमनची किंवा अभिनेत्याची सुरक्षितता ही मुख्य बाब असल्याचे तो सांगतो.
सध्या तो शाहरुख खानसोबतच्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारीत गुंतला आहे, पण त्याबद्दल लवकरच घोषणा करणार असल्याचे तो सांगतो. त्यासोबत पुढील वर्षी अजय देवगणसोबत ‘सिंघम’मधून परतण्याचा त्याचा विचार आहे. ‘गोलमाल’च्या चौथ्या भागाची आपल्यालाही उत्सुकता आहे, पण योग्य कथेच्या शोधत असल्याचे तो सांगतो. थोडक्यात सांगायचे तर या दोन वर्षांमध्ये रोहित शेट्टीच्या चित्रपटांचा आणि त्याच्या अ‍ॅक्शन स्टंट्सचा धडाका पाहायला मिळणार हे नक्की.  
माझ्या चित्रपटांमध्ये केवळ गाडय़ा उडत असतात, असे बोलले जाते; पण प्रेक्षकांनी लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येक गाडीत स्टंटमन बसलेला असतो, जो केवळ तुमच्या मनोरंजनासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालत असतो. चित्रपटांमध्ये उडणाऱ्या गाडय़ा या नेहमीच्या गाडय़ा नसतात, त्यांचे इंजिन, यंत्रप्रणाली सर्व वेगळे असते. त्यात पेट्रोल किती असायला हवे, किती आग लागणे गरजेचे आहे याचाही बारकाईने अभ्यास होत असतो. अ‍ॅक्शन स्टंट म्हटले की, जिवावर उदार होणे आलेच, पण कोणताही स्टंट तयार करताना त्याच्या परिणामांची आणि त्यावरील उपायांची पूर्ण तयारी केली जाते. अपघात होईलच, हा आमचा पहिला विचार असतो, मग तो होऊ नये म्हणून काय करता येईल, हे आम्ही पाहतो. कारण स्टंट करणाऱ्या स्टंटमनची किंवा अभिनेत्याची सुरक्षितता सर्वात महत्वाची असते.. – रोहित शेट्टी

 – मृणाल भगत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 1, 2015 2:29 am

Web Title: action stunts not easy says rohit shetty
टॅग : Rohit Shetty
Next Stories
1 सोंगी भारूड
2 ‘नटसम्राट’मध्ये नाना पाटेकर
3 जादा ‘फिल्मी’
Just Now!
X